लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत २ हजार लोकांना प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांतील १६० प्रशिक्षणार्थींचा पदवीदान समारंभ अंधेरी पश्चिमेकडील राधाकृष्ण हॉटेलमध्ये मंगळवारी पार पडला. यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार आशिष शेलार यांच्या हस्ते पदवीदान करण्यात आली.या वेळी शेलार म्हणाले की, रेस्टॉरंटबाहेर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा बोर्ड लागेल, तेव्हा इथला नोकर ‘कौशल्य’धारित नोकर आहे, हे स्पष्ट होईल. त्यामुळे ग्राहक अभिमानाने रेस्टॉरंटमध्ये येतील. सरकारला भरलेला कर गरिबांना शिकवण्यासाठी वापरात येत असल्याची प्रतिक्रियाही ग्राहक व्यक्त करतील, असेही ते म्हणाले.या पदवीदान समारंभात चार रेस्टॉरंटमधील १६० प्रशिक्षणार्थींना ‘रुस्तमजी अकादमी फॉर ग्लोबल करिअर्स’ आणि ‘प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना’ यांच्यामार्फत गौरवण्यात आले. संस्थेचा हा पहिलाच पदवीदान समारंभ असल्याची माहिती रुस्तमजी अकादमी विशेष प्रकल्पाचे प्रमुख डॉ. शोभित कालिया यांनी दिली. ते म्हणाले की, या योजनेमार्फत रेस्टॉरंटमध्ये विविध ठिकाणी काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना गौरविले जाईल. भविष्यात रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या विविध स्तरांवरील लोकांना प्रशिक्षण देण्याचा संस्थेचा मानस आहे. या योजनेतून १ लाख प्रशिक्षणार्थी तयार करण्याचे पंतप्रधानांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न संस्था करेल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
दोन हजार लोकांना कौशल्य विकासाचे धडे!
By admin | Published: June 01, 2017 5:53 AM