मुंबई - कोरोनामुळे संकटांत सापडलेली महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस 18 सप्टेंबरपासून पूर्ण आसन क्षमतेने धावत आहे. गोरगरिबांच्या लालपरीला पूर्ण आसन प्रवासी वाहतूक करण्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाला राज्य सरकारकडून परवानगी मिळाली. मात्र, प्रवासादरम्यान प्रत्येक प्रवाशानं मास्क लावणे, सॅनिटायझ करणे बंधनकारक आहे. त्यामुळे, खासगी बस वाहतूक करणाऱ्या प्रवाशांकडूनही संपूर्ण क्षमतेनं प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर, राज्य सरकारने खासगी बस वाहतुकीलाही हिरंवा कंदील दर्शवला आहे.
राज्यात सर्व खासगी कंत्राटी बसमधून १०० टक्के प्रवासी आणि पर्यटक वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय घेतानाच परिवहन आयुक्तालयाकडून खासगी बससाठी मानक कार्य पद्धती जाहीर करण्यात आली आहे. त्यात करोना संसर्गाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याचे तंतोतंत पालन करणे बस वाहतूकदारांना बंधनकारक असणार आहे. मास्क नसलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, बसमध्ये अतिरिक्त मास्क आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी, बस निर्जंतुक करण्याची जबाबदारी बस मालकाची असेल, या त्यातील महत्त्वाच्या अटी असणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने करण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या नियमानुसार 18 सप्टेंबरपासून सामाजिक अंतर राखून पूर्ण क्षमतेनं वाहतूक सुरू करण्यास एसटीला परवानगी दिली होती. आधीच तोट्यात असलेली एसटी त्यात कमी प्रवाशांची वाहतूक आणि अधिक तिकीट यामुळे प्रवासी बरोबर एसटी महामंडळ दोघेही तोटा सहन करत होते. एसटी विभागांकडून टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कर्नाटक आणि गुजरात राज्यात 100 टक्के प्रवाशी वाहतूक सुरू केल्यानंतर आता एसटीला पूर्ण आसनक्षमतेने वाहतूक करण्यास राज्य सरकारनं मंजुरी मिळाली आहे. तर, उद्यापासून खासगी ट्रॅव्हल्स एजन्सींनाही पूर्ण क्षमतेनं वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
प्रवाशांना हे बंधनकारक -
बसेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क व सॅनिटाईझर वापरणं बंधनकारक आहे.
वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या बसेस निर्जंतूक करण्यास मार्गस्थ करण्यात याव्यात.
कोरोना वाहतूक नियमावलींचं पालन करणे बंधनकारक असणार आहे.