‘आंदोलन करायचे सोडून विखेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र’, मला बोलायला भाग पाडू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 06:45 AM2017-09-20T06:45:58+5:302017-09-20T06:46:00+5:30
एकीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याचे सोडून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाववाढ रद्द करा असे पत्र देतात, अशा शब्दात काँग्रेसच्या काही नेत्यांनी विखेंच्या भूमिकेवर टीका केली आहे.
मुंबई : एकीकडे पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडलेले असताना रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्याचे सोडून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून भाववाढ रद्द करा असे पत्र देतात, अशा शब्दात काँग्रेसच्या काही नेत्यांनी विखेंच्या भूमिकेवर टीका केली आहे.
राज्य सरकारने दुष्काळी उपकर व इतर सर्व अधिभार एकत्रित करुन पेट्रोलियम पदार्थांवर लादलेले वाढीव कर तातडीने रद्द करावे, अशी मागणी विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. त्यावर काँग्रेसचे एक ज्येष्ठ नेते म्हणाले, आंदोलनाची भूमिका घेऊन अशावेळी रस्त्यावर उतरायला हवे. युपीए सरकारच्या काळात भाजपाने रस्त्यावर उतरुन प्रचंड आंदोलने केली, त्याच्या क्लीप सोशल मिडीयात फिरत आहेत. मात्र आमचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देत आहेत. काय बोलणार? अशी अगतिकता या नेत्याने व्यक्त केली.
२०१५ मध्ये दुष्काळी परिस्थिती असताना राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवर उपकर लावला होता. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने दुष्काळाच्या नावाखाली पेट्रोलियम पदार्थांचा वापर करणाºया ग्राहकांकडून उपकराची वसुली करणे अन्यायकारक आहे, असे विखे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. शेजारील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलचे दर साधारणत: १० ते ११ रुपयांनी अधिक असल्यामुळे ग्राहकांच्या संतापात भर पडली आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोलियम पदार्थांवरील वाढीव कर तातडीने रद्द करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
>सिंधुुदुर्ग जिल्ह्यात नितेश राणे यांनी आंदोलन केले, त्यावेळी त्यांना अटक होणार होती. पण ती अटक टाळण्यासाठी मी काय केले, याची वाच्यता करण्यास कोणी भाग पाडू नये, असा गर्भित इशारा विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी नितेश यांना दिला आहे. कुडाळ येथील कार्यक्रमात नितेश राणे यांनी विखे यांच्यावर टीका केली होती.