गणपतीला जाऊ द्या, वेटिंग तिकिटावर प्रवास करू द्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 10:18 AM2024-07-28T10:18:40+5:302024-07-28T10:19:04+5:30
२०२ गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग २१ जुलैला सुरू झाले आणि काही मिनिटांतच वेटिंग लिस्ट ४००पार झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्यांना गाडीतून खाली उतरविण्याची कारवाई रेल्वेने सुरू केली आहे. त्यामुळे गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जायचे कसे? असा सवाल कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी केला आहे. किमान गणेशोत्सवाच्या काळात तरी वेटिंग तिकिटावर प्रवास करू द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे.
२०२ गणपती स्पेशल गाड्यांचे बुकिंग २१ जुलैला सुरू झाले आणि काही मिनिटांतच वेटिंग लिस्ट ४००पार झाली. पश्चिम रेल्वेनेही गणेशोत्सवासाठी विशेष गाड्या सोडल्या असून, त्यांचे बुकिंग आज, २८ जुलैपासून सुरू होणार आहे. कोकण रेल्वेची तिकिटे दलाल बुक करतात, मात्र त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या दादर किंवा ठाण्यासारख्या स्थानकांवर येतात तेव्हा त्यांचे दरवाजे आतील प्रवासी उघडीत नाहीत. अशा वेळी आरपीएफ पोलिसांची मदत घ्यावी लागते. मात्र यावर रेल्वेने सकारात्मक विचार करण्याची गरज आहे. - राजू कांबळे, प्रमुख, कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ.
गणेशोत्सवासाठी विशेष रेल्वे गाड्यांतून कोकणात जाणाऱ्या वेटिंगवरील प्रवाशांवर रेल्वेने कारवाई करू नये. माणुसकीच्या नात्याने या काळात चाकरमान्यांना मेल/एक्स्प्रेसमधून प्रवास करण्याची मुभा द्यावी. कारण या काळात सरकारी आणि खासगी वाहतुकीला मोठी गर्दी असते. - यशवंत जडयार, सचिव, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती