मुंबई : डिसेंबर २०२२नंतर लगेचच तीन महिन्यांनी मुंबईत जी २० परिषद होऊ घातली आहे. उद्यापासून तीन दिवस होणाऱ्या या बैठकीत परदेशातील प्रतिनिधी मुंबईत हजर राहणार आहेत. या पाहुण्यांवर छाप पाडण्यासाठी पालिकेने कोणतीही कसर सोडलेली नाही. चकाचक रस्ते, रस्त्यांना रोषणाई, हरितीकरण या कामांसाठी पालिकेकडून सढळ हस्ते खर्च करण्यात आला आहे.
जी-२० परिषदेची पहिली बैठक मुंबईत डिसेंबर २०२२ मध्ये झाली होती. ही परिषद २८ ते ३० मार्च या कालावधीत पुन्हा होणार आहे. पालिकेने बैठकीची ठिकाणे व परदेशी पाहुणे राहणार असलेल्या हॉटेल परिसरांमध्ये सुशोभिकरण, स्वच्छता यादृष्टीने विशेष कामे केली आहेत. ग्रॅण्ड हयात हॉटेल (सांताक्रूझ) ते ताज लॅण्ड्स एण्ड (वांद्रे) परिसर यासह सांताक्रूझ, कलिना, कलानगर, वांद्रे - कुर्ला संकुल, मिठी नदी, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास विभाग कार्यालय, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड आदी परिसरांचे सुशोभिकरण व या परिसराची स्वच्छता करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर येथील काही रस्ते सुस्थितीत असतानाही त्यावर रंगरंगोटी व पृष्ठीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी पालिकेने लाखो रूपये खर्च केल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.
या परिषदेनिमित्त मुंबई महापालिकेने केलेल्या तयारीची पाहणी आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी सोमवारी केली. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त (शहर) आशिष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (परिमंडळ ३) रणजित ढाकणे, उपायुक्त (विशेष) संजोग कबरे, उपायुक्त (पायाभूत सुविधा) उल्हास महाले, एच पूर्व विभागाच्या सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, एच पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते, के पूर्व विभागाचे सहायक आयुक्त मनीष वाळंजू, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे सहआयुक्त रामामूर्ती उपस्थित होते. दरम्यान, याआधीही जी २० परिषदेसाठी पालिकेने मुंबईत सुशोभीकरण केले होते. तेव्हाही पालिका प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. आता पुन्हा खर्च करणार असल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.