शंभर टक्के लसीकरणासाठी महाराष्ट्राला मोकळीक द्या : राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:06 AM2021-04-15T04:06:31+5:302021-04-15T04:06:31+5:30
राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वारंवार निर्बंध किंवा टाळेबंदी लावणे महाराष्ट्राला परवडणारे ...
राज ठाकरे यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वारंवार निर्बंध किंवा टाळेबंदी लावणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. पण, राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो, असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर उपस्थित केला आहे. तसेच शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लस खरेदी करण्याची परवानगी देण्याची मागणीही राज यांनी केली आहे.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवून लसींसंदर्भात मागण्या केल्या. महाराष्ट्राला स्वतंत्रपणे लसी खरेदी करू द्याव्या, राज्यातील खासगी संस्थांनाही लसी खरेदी करता याव्यात; ‘सिरम’ला महाराष्ट्रात मुक्तपणे, पण योग्य नियमन करून लस विक्रीची परवानगी द्यावी, लसींचा पुरवठा वेळेत व्हावा म्हणून हाॅफकिन, हिंदुस्तान अँटिबायोटिक आदी संस्थांना लस उत्पादनाची मुभा द्यावी आणि कोरोनावरील उपचारांसाठी लागणाऱ्या रेमडेसिविर, ऑक्सिजन अशा औषधांचा पुरेसा पुरवठा राज्यात असावा म्हणून राज्याला आवश्यक पावले उचलण्यासाठी मोकळीक द्यावी, अशी मागणी राज यांनी मोदी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
कोरोना साथीचे विविध राज्यांमध्ये वेगवेगळे परिणाम झाले आहेत. या साथीला नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक राज्याला तिथल्या स्थानिक परिस्थितीनुसार धोरण आखण्याची गरज आहे. ‘आरोग्य’ हा विषय राज्यांचा आहे. म्हणून केंद्राने राज्याला केवळ परवानगीच नाही, तर स्थानिक परिस्थितीला अनुसरून योग्य ती उपाययोजना आखण्यासाठी प्रोत्साहनच द्यावे. यामुळे प्रत्येक ठिकाणी भिन्न उपाय केले जातील, ज्यातून एकमेकांना शिकण्याची संधीही मिळेल, असेही राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.