मुंबई : पाकिस्तानी नागरिक म्हणून कोणताही रोष नाही, पण काश्मीर आणि पाकिस्तानात दहशतवादाला खतपाणी घालण्याला आपला विरोध आहे. आपण कमकुवत नाही हे दाखवून देण्याची आवश्यकता आहे. दहशतवादाच्या विरोधात गांभीर्याने पावले उचलण्याची गरज असून, पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले पाहिजे, असे म्हणत शांती आणि क्रांती एकत्र झाली पाहिजे, असे प्रतिपादन बाबा रामदेव यांनी केले.मुंबई मराठी पत्रकार संघात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत बाबा रामदेव बोलत होते. या वेळी त्यांनी १७ ते २१ जानेवारी दरम्यान आयोजित मोफत योग शिबिराविषयी माहिती दिली. ते म्हणाले, मधुमेह, उच्च रक्तदाब, पित्त, किडनीचे आजार, गर्भाशयाचे आजार, संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. यावर उत्तम उपाय म्हणजे योगसाधना. त्यामुळेच योगसाधना लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. शास्त्रशुद्ध पद्धतीने योगसाधना केल्यास आरोग्य चांगले राहते. यासाठीच १७ ते २१ जानेवारी दरम्यान योग आणि ध्यानधारणा शिबिरांचे आयोजन मुंबई आणि ठाण्यात करण्यात आले आहे. येथे योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.येथे होणार योग शिबिर वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानात १७ ते २१ जानेवारी दरम्यान पहाटे ५ ते सकाळी ७.३० या वेळेत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. १९ जानेवारी रोजी महिला संमेलन, २० जानेवारी रोजी विद्यार्थी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. हे दोन्ही कार्यक्रम दुपारी ४ ते ६ या वेळेत वांद्रे येथील एमएमआरडीए मैदानावर होतील. २१ जानेवारी रोजी योग दीक्षा सभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ठाणे येथील दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होईल.
शांती आणि क्रांती एकत्र होऊ द्या
By admin | Published: January 10, 2016 3:28 AM