सांगली/ मुंबई- उच्च न्यायालयाने गुरुवारी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश दिल्यानंतर संप मिटल्याचे चित्र निर्माण झाले असताना, शुक्रवारी दुपारी १०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या एका जत्थ्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या बंगल्यावर हल्ला केला.
आंदोलकांनी जोरदार निर्दशने करीत दगड, चप्पलफेक केली. महिलांनी बांगड्याही भिरकावल्या. आंदोलकांवर रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यास सुरूवात झाली होती. या हल्ल्यामागे सूत्रधार कोण, याचा शोध सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर रात्री उशिरा सदावर्ते यांना अटक करण्यात आली.
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर राज्यातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. बिरोबांना सगळं माहित आहे. त्यामुळे आम्ही देवाकडे आज समाजाचं सर्व चांगलं होऊ दे अशी प्रार्थना केली. तसेच एसटी कर्मचाऱ्यांचे ही चांग भलं होऊ दे, अशी सुद्धा प्रार्थना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच सरकारचे ही चांगभलं चांगलं करण्याची इच्छा जागृत होऊ दे, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हणाले. ते सांगलीच्या आरेवाडी येथील बिरोबाच्या बनात बिरोबाचे दर्शन घेण्यासाठी आले होते.
मुख्यमंत्र्यांची पवारांशी फोनवरून चर्चा-
हल्ल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सायंकाळी शरद पवार यांच्याशी फोनवरून चर्चा केली. नेमकी घटना कशी घडली याची माहिती मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडून घेतली. या कृत्यामागे कोण आहेत ते शोधून कडक कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
अस्वस्थता पसरविण्याचा काही शक्तींचा प्रयत्न-
आमचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यामागे राजकीय पक्ष, अज्ञात शक्तींचा हात असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने चौकशी केली जाईल. - दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री