Join us

चक्रीवादळ येवो, नाही तर लाटा धडको! कोस्टल रोड सुरूच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 12:37 PM

समुद्राचे पाणी मुंबईत शिरणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वाहतूक कोंडीवर उतारा म्हणून महापालिका प्रिन्सेस स्ट्रीट ते वांद्रे वरळी सी लिंकदरम्यान कोस्टल रोड बांधत असून, समुद्राचे पाणी कोस्टल रोडच्या खालून पुन्हा मुंबईत शिरू नये यासाठी १६ ठिकाणी फ्लड गेट बसविण्यात आले आहेत. फ्लड गेटची रुंदी अडीच पटींनी वाढविण्यात आली आहे, अशी माहिती कोस्टल रोड प्रकल्पाचे प्रमुख अभियंता मांतय्या स्वामी यांनी दिली.

विशेष म्हणजे अरबी समुद्रात उठणाऱ्या चक्रीवादळादरम्यान लाटांनी कितीही तांडव केले तरी कोस्टल रोडवरून वाहतूक सुरूच राहील, तशी त्याची रचना करण्यात आल्याचा दावा पालिकेने केला आहे.

दगडाची सी वॉल (सागरी भिंत) जानेवारी २०२० मध्ये बांधायला घेतली. या मार्गाच्या १०.५ किमी पैकी ७.५ किमी लांब मार्गावर सी वॉल बांधल्यानंतर प्रत्यक्षात सांगाडा व त्यानंतर रस्ता बांधण्यात येत आहे. - विजय झोरे, उप अभियंता, कोस्टल रोड प्रकल्प

नवी मुंबईचे दगड लाटा झेलणार

नवी मुंबईच्या उलवे येथील खाणीतून आर्मर रॉक हा दगड सी वॉल उभारण्यासाठी मुंबईत आणण्यात आला. एका दगडाचे वजन एक ते तीन टन इतके असून धडकणाऱ्या लाटा झेलण्याची क्षमता दगडांमध्ये आहे.

स्पीड लिमिट

८० किमी प्रति तास या वेगाने कोस्टल रोडवरून जाता येणार आहे. इंटरचेंजच्या ठिकाणी ६० किमी प्रति तास या वेगाने गाड्या धावतील. 

  • ७६% सागरी किनारामार्गाचे काम पूर्ण
  • कोस्टल रोडचे संपूर्ण बांधकाम मे २०२४ पर्यंत पूर्ण होणार
  • हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा.

प्रकल्पाचे इतके काम पूर्ण

  • बोगदा खणन : १०० टक्के पूर्ण
  • भराव : ९५ टक्के पूर्ण
  • समुद्रभिंत : ८४ टक्के पूर्ण
  • आंतरबदल : ५७% पूर्ण
  • पूल : ६०% पूर्ण
टॅग्स :मुंबई