मुंबई : एका घटस्फोटित महिलेला तिच्या मुलीसह अमेरिकेत स्थलांतरित होण्याची परवानगी उच्च न्यायालयाने अलीकडेच दिली. मात्र, विभक्त पतीस मुलीला भेटण्याची परवानगी नाकारल्यास पुण्यातील सहमालकीच्या सदनिकेतील निम्मा वाटा गमवावा लागेल, अशी अट न्यायालयाने त्या महिलेला घातली.
मुलीला अमेरिकेत नेण्याची परवानगी मागण्यासाठी संबंधित महिलेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावरील सुनावणी न्या. बी. पी. कुलाबावाला, एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठापुढे होती. त्यावर न्यायालयाने ४ सप्टेंबरला निकाल दिला. या जोडप्याने २०२० मध्ये परस्पर संमतीने घटस्फोट घेतला. परंतु, मुलीच्या ताब्यावरून त्यांच्यात वाद झाला. पुण्याच्या कुटुंब न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला.
पत्नीविरोधात अवमान याचिका दाखलवडिलांना नियमित मुलीला भेटण्याची परवानगी दिली. गेल्या तीन वर्षांत, दोन्ही पक्षांनी अनेक अर्ज दाखल केले त्यात पतीने आपल्या मुलीला भेटू न दिल्याचा आरोप करत पत्नीविरोधात अवमान याचिका दाखल केली. अमेरिकेत स्थलांतरित होण्यासाठी महिलेने न्यायालयात अर्ज दाखल केला, तेव्हा खंडपीठाने या जोडप्याला मध्यस्थाकडे जाऊन त्यांच्यातील वाद मिटवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर या जोडप्याने उच्च न्यायालयात संमतीपत्र दाखल केले. विभक्त पतीने पत्नीला मुलीला अमेरिकेत नेण्यास परवानगी दिली आहे. महिला मुलीला परदेशात नेत असल्याने तिच्याकडून अटींचे उल्लंघन झाल्यास पती अवमानाची कारवाई करू शकतो. या करवाईमध्ये पत्नीने जाणूनबुजून अटींचे उल्लंघन केल्याच्या निष्कर्षावर न्यायालय पोहोचले.