आपण दोघे नार्को टेस्ट करूया, सत्य समोर येईल! परमबीर सिंह यांचे देशमुख यांना आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 10:33 AM2024-08-06T10:33:26+5:302024-08-06T10:33:48+5:30
परमबीर सिंह म्हणाले, या प्रकरणावर मी आजपर्यंत कधीही सार्वजनिकरीत्या बोललो नाही. मला जे सांगायचे होते ते मी न्यायालयात सांगितले. मात्र, अनिल देशमुख यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात डील झाली, त्यानुसार आपल्यावर आरोप करण्यात आले, असा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्यानंतर परमबीर सिंह यांनीही त्याला प्रत्युत्तर देत आपली व अनिल देशमुख यांची नार्को चाचणी करण्यात यावी म्हणजे सत्य समोर येईल, असे आव्हान दिले आहे.
परमबीर सिंह म्हणाले, या प्रकरणावर मी आजपर्यंत कधीही सार्वजनिकरीत्या बोललो नाही. मला जे सांगायचे होते ते मी न्यायालयात सांगितले. मात्र, अनिल देशमुख यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले आहेत. माझ्यात आणि फडणवीस यांच्यात डील झाल्याचे ते म्हणत आहेत, त्यामुळे मला बोलणे भाग आहे. माझी आणि अनिल देशमुख यांची नार्को चाचणी करता सगळे सत्य समोर येईल.
अनिल देशमुख यांनी जे आरोप केले माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही, असेही परमबीर सिंह म्हणाले.
आरोपांसाठी डील झाले : देशमुख
नागपूर : मुकेश अंबानी यांच्या घरासमोर गाडीत बॉम्ब ठेवला, त्या गाडी मालकाची हत्या झाली. या घटनेमागे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह मास्टर माइंड होते. त्यांना अटक होणार होती. त्यामुळे ते देवेंद्र फडणवीस यांना शरण गेले. म्हणून, परमबीर यांना मदत करण्यासाठी माझ्यावर आरोप लावण्याचे डील त्यांच्यात झाल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी येथे केला.
झुठ बोले कौआ काटे : फडणवीस
देशमुख यांनी केलेल्या आरोपांवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘झुठ बोले कौआ काटे, काले कौअे से डरियो’, असे म्हणत विषय संपविला.