मुंबई : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे (बॅलेट पेपर) मतदान व्हावे, अशी आमची मागणी आहे. तसे होणार नसेल तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज दिला.
सरकार आणि निवडणूक आयोगाला ईव्हीएमवरच मतदान घेण्यात रस असेल तर आपण निवडणूक प्रक्रियेत सहभागीच होऊ नये, अशी भूमिका विविध राजकीय पक्षांनी घ्यायला हवी, असे मत आंबेडकर यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.मतपत्रिकाच आल्या पाहिजेत हे माझे ठाम मत आहे. ते माझ्या पक्षात मान्य केले जाईल हे मी आताच ठामपणे सांगू शकत नाही. पण हे मत पक्षात स्वीकारले जावे, असा प्रयत्न मी करेन, असेही ते म्हणाले. मतपत्रिकाद्वारे मतदान व्हावे या मागणीसाठी अन्य पक्षांशी चर्चा करण्यास आपण पुढाकार घेऊ असेही त्यांनी सांगितले.अशोक चव्हाण यांचाही आग्रहइव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करावा अशी काँग्रेसची भूमिका आहे. अनेक ठिकाणी इव्हीएमबाबत तसेच हॅकिंगच्याही तक्रारी आहेत, निकालांबाबत शंकाही आहेत. पारदर्शकता आणणे आवश्यक आहे. बॅलेट पेपर पुन्हा आणा, जनतेचा जो कौल असे तो मान्य करू, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.