मुंबई-
राजकारण्यांनी आमचं जगणं आता मुश्कील केलं आहे. आम्हाला जगू द्या. आमच्या मुलीची अशीच बदनामी होत राहिली तर आम्हीही आमच्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करुन घेऊ आणि त्याला हेच राजकारणी जबाबदार असतील असा इशारा दिशा सालियनच्या मातोश्रींनी दिला आहे. यावेळी राजकारण्यांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांमुळे आम्हीही तणावात आहोत, असं दिशाच्या मातोश्री म्हणाल्या. दिशाच्या मृत्यूचं प्रकरण आता जास्त वाढवू नका असं हात जोडून सर्वांना विनंती करणाऱ्या दिशाच्या मातोश्रींना अश्रू अनावर झाले होते.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज दिशा सालियनच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर दिशा सालियनच्या मातोश्री आणि वडिलांनी एक लेखी तक्रारपत्र किशोरी पेडणेकर यांच्याकडे दिलं. दिशाची बदनामी होत असल्याची तक्रार सालियन यांच्या मातोश्रींनी महिला आयोगाकडे केली आहे. दिशाच्या बाबतीत जे घडलं ते सर्वांना माहित आहे. पोलिसांनीही सर्व चौकशी केली आहे आणि ती कामाच्या खूप तणावत होती त्यामुळे तिनं हे टोकाचं पाऊल उचललं होतं. आम्ही त्या प्रकरणातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहोत. पण वारंवार माझ्या मुलीची बदनामी करुन राजकारणी उगाचच विषय वाढवत आहेत. आम्हाला जगू द्या, असं दिशाच्या मातोश्री म्हणाल्या.
"माझ्या मुलीची बदनामी करण्याचा हक्क यांना कुणी दिला? केवळ राजकारणासाठी ते करत असलेल्या आरोपांमुळे आमची इथं काय अवस्था होत आहे याची त्यांना कल्पना नसावी. आम्हाला कृपा करुन जगू द्या. दिशाबाबतचे वेगवेगळे आरोप ऐकून आम्हीही तणावाचा सामना करत आहोत आणि आम्हालाही आता आत्महत्या करावीशी वाटत आहे. तसं जर आम्ही पाऊल उचललं तर यासाठी सर्व राजकारणी लोक जबाबदार असतील. दिशाची एक डील रद्द झाली होती त्यामुळे ती तणावात होती. पण त्यावेळी ती इतका टोकाचा विचार करत असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. त्यानंतर तिच्या दोन मोठ्या डील रद्द झाल्या होत्या. त्यामुळेच ती तणावाचा सामना करत होती", असं दिशाच्या आईनं सांगितलं.