आम्हाला शिकवू द्या...! प्राथमिक शिक्षकांचा राज्यव्यापी एल्गार
By स्नेहा मोरे | Published: September 30, 2023 07:26 PM2023-09-30T19:26:30+5:302023-09-30T19:27:07+5:30
‘आम्हाला शिकवू द्या’ हे घोषवाक्य घेऊन राज्य प्राथमिक शिक्षक संघ २ ऑक्टोबरला ‘राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा’ काढणार आहे.
मुंबई - राज्यभरात शिक्षणाचा खेळ खंडोबा सुरू असून अशैक्षणिक व ऑनलाइन कामे, शाळा खासगीकरणाचे व शाळा बंद करण्याचे धोरण याबद्दल संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आता शिक्षकांनी एल्गार पुकारला असून, ‘आम्हाला शिकवू द्या’ हे घोषवाक्य घेऊन राज्य प्राथमिक शिक्षक संघ २ ऑक्टोबरला ‘राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा’ काढणार आहे.
शिक्षण हक्क अधिनियमानुसार मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असताना खासगीकरणास पूरक धोरणे आणली आहेत. तर, गुरुजी माहित्या व उपक्रमात व्यग्र आहेत. त्यामुळे सामान्य कुटुंबातील मुलांच्या शाळा धोक्यात आल्या आहेत. शाळा सुरू झाल्यापासून राज्य शासन, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, डायट, जिल्हा परिषद अशा वेगवेगळ्या स्तरावरून आतापर्यंत शंभर प्रकारची माहिती मागविली आहे.
शालार्थ, स्टुडंट पोर्टल, स्कूल पोर्टल, यु-डायस पोर्टल, बदली पोर्टल, दिक्षा ॲप, एमडीएम ॲप, विनोबा ॲप, उल्हास ॲप, प्रशिक्षणांच्या लिंक अशा रोज माहित्या मागविल्या जात आहेत. शाळा बंद करणे, खासगी करणे या बेकायदेशीर बाबी घडत आहेत. शिक्षण विभाग याबाबत संवादास तयार नसल्याने २ ऑक्टोबर रोजी स्थानिक पातळीवर आक्रोश आंदोलन करणार आहेत. वर्षानुवर्षे रखडलेली मुख्याध्यापक पदोन्नती, शिक्षकभरती पूर्ण करावी, अशा मागण्या शिक्षक संघाच्या आहेत. शहर हद्दवाढीतील शिक्षक, सेवाज्येष्ठ व दुर्गम भागातील शिक्षक यांच्याबाबत असंवेदनशील धोरण आहे. सतत प्रलंबित असलेले फंड प्रस्ताव, वैद्यकीय बिले, पुरवणी बिले याबाबतच्या लाल फितीच्या कारभारामुळे लागणारा विलंब आक्रोश मोर्चामध्ये उघड करणार अशी माहिती प्राथमिक शिक्षक संघाचे बाळासाहेब मारणे यांनी दिली आहे.