Join us

गळतीचे पाणी माफियांच्या घशात!

By admin | Published: February 22, 2016 3:27 AM

पाण्याची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखल्या. प्रत्यक्षात गळती रोखण्यासाठी प्रशासनाला पावलागणिक अपयश आले. अर्थसंकल्पात तरतूद करूनही समस्या

- सचिन लुंगसे,  मुंबईपाण्याची गळती रोखण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना आखल्या. प्रत्यक्षात गळती रोखण्यासाठी प्रशासनाला पावलागणिक अपयश आले. अर्थसंकल्पात तरतूद करूनही समस्या कायमस्वरूपी मिटली नाही. रस्ते खोदकाम अथवा इतर खोदकामांवेळी संबंधित प्राधिकरण आणि महापालिका यांच्यात समन्वयाचा अभाव आढळून आला. त्यामुळे गळतीची समस्या मिटण्याऐवजी वाढतच गेली. गतवर्षीची आकडेवारी पाहता शहर विभागात ९ हजार ६२०, पूर्व उपनगरात ४ हजार ६९७ आणि पश्चिम उपनगरात ५ हजार ४६४ एवढ्या जलगळत्यांची माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात गळतीचे पाणी हे माफियांच्या घशात जात असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. या सगळ्या प्रकारामागे प्रशासन, राजकारणी आणि माफियांचे संगनमत आहे.बोरीवली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी महापालिकेकडे माहिती अधिकारांतर्गत मागवलेल्या कागदपत्रांतून ही बाब समोर आली आहे. महापालिकेने जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील जलगळत्यांची माहिती यादव यांना दिली आहे. या वर्षीच्या जानेवारी महिन्यातील माहितीसाठी मात्र अपील करण्यात यावे, असे म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेच्या जलविभागाकडे गळती शोधण्यासाठी साऊंडिंग रॉड आणि लिंक लोकेटर ही उपकरणे उपलब्ध असल्याचे प्रशासनाने आवर्जून नमूद केले आहे.महापालिकेच्या जल विभागामार्फत दृश्य व जमिनीखालील जलगळत्या शोधल्या जातात. जमिनीखालील पाणीगळती साऊंडिंग रॉड, गळती अन्वेषणाची अद्ययावत उपकरणे वापरून शोधली जाते. हे जलगळती शोधण्याचे काम दररोज होते. जानेवारी ते डिसेंबर २०१५ या कालावधीत शहर विभागात एकूण ५ हजार ८६३ दृश्य आणि ३ हजार ७८४ जमिनीखालील अशा एकूण ९ हजार ६४७ जलगळत्यांचा शोध घेण्यात आला. पूर्व उपनगरात ४ हजार ६९७ गळत्या साऊडिंगद्वारे मुकादमाने शोधल्या. गळती शोधण्यासाठी साऊंडिंग रॉडसह गळती शोधण्याचे यंत्र, जलवाहिनी शोधण्याचे यंत्र आणि जलवाहिनीवरील झडपा शोधण्याचे यंत्र या उपकरणांची मदत घेण्यात आली. पश्चिम उपनगरातील सर्व नऊ विभागांत दररोज दृश्य आणि जमिनीखालील जलगळत्या याच माध्यमातून शोधल्या जात आहेत. जलगळती शोधण्याचे काम दैनंदिन तसेच दूषित पाण्याच्या, कमी जलपुरवठा याबाबतच्या तक्रारीनुसार केले जाते. जून ते डिसेंबर २०१५ या कालावधीत एकूण २ हजार ३४३ दृश्य आणि जमिनीखालील ३ हजार १२१ अशा एकूण ५ हजार ४६४ जलगळत्या शोधण्यात आल्या.गळतीमधून होणाऱ्या पाण्याचा अपव्यय कमी करण्यासाठी गळती अन्वेषण विभागाच्या पुनर्स्थापनेचे काम २०१३ सालापासून टप्प्याटप्प्याने हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार पश्चिम उपनगरात ७ विभागात गळती अन्वेषण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. शिवाय काही विभागात मनुष्यबळ कमी असल्याने कालांतराने गळती अन्वेषण कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. जलवितरण आणि सुधारणा प्रकल्प अंतर्गत, शास्त्रशुद्ध पद्धतीने गळती अन्वेषणाचे काम करण्यासाठी एम/पश्चिम विभागातील गळती अन्वेषणाचे कर्मचारी, सेवापुरवठादाराबरोबर काम करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जलवाहिनी टाकल्यावर इतर प्राधिकरणामार्फत रस्ते खोदताना जलवाहिनीला नुकसान पोहोचते. अशी माहिती महापालिकेद्वारे देण्यात आली आहे.आपणही जबाबदार- वाहत्या नळातून एका मिनिटांत १२ लीटर पाणी वाया जाते.- दात घासण्यासाठी पाच मिनिटे उघड्या ठेवलेल्या नळातून ६० लीटर पाणी वाया जाते.- नळाच्या तोटीतून सेकंदाला एक थेंब गळत असेल तर दररोज पाच लीटरहून अधिक पाणी वाया जाते. आठवड्याला ३६.४ लीटर आणि वर्षाला १ हजार ८९१ लीटर पाणी वाया जाते.- माणसाला दिवसागणिक किती पाणी लागते? याचा विचार केला तरी साधारणपणे पिण्यासाठी ३ लीटर, आंघोळीसाठी १५ ते २० लीटर व इतर कामांसाठी १०० लीटर पाणी लागते. म्हणजेच सरासरी १२५ ते १५० लीटर पाणी ही प्रत्येकाची गरज असते.- ५ माणसांच्या घरात जवळजवळ ३०० लीटर पिण्याचे पाणी वाया जाते.- देशातील ३० ते ४० टक्के जनतेला शुद्ध पाणी अभावानेच मिळते आणि २० ते ३० टक्के जनतेला त्यासाठी झगडावे लागते.- मुंबईत साधारणपणे २ हजार मिलीमीटर म्हणजे २ मीटर पाऊस पडतो; असे गृहीत धरले तर पावसाळ्यात एकूण १ हजार ८०० घनमीटर म्हणजे १८ लाख लीटर पाणी इमारतीच्या गच्चीवरून वाहून जाते.पाणीमाफिया जबाबदारपाण्याची गळती आणि चोरी या दोन्ही प्रकरणांची कारणमीमांसा होत नाही. महापालिका प्रशासन, राजकारणी आणि पाणीमाफिया यांची मिलीभगत आहे. परिणामी, गळतीच्या नावाखाली मुंबईकरांचे २५ टक्के पाणी हे माफियांना विकले जात आहे. या प्रकरणाची कारणमीमांसा झाली तर गळतीला नक्कीच आळा बसेल.- शरद यादव, माहिती अधिकार कार्यकर्ते