#GoodBye2017 : आॅनलाइनच्या नादात ‘लेटमार्क’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 02:21 AM2017-12-27T02:21:22+5:302017-12-27T18:39:04+5:30
मुंबई : विद्यार्थ्यांसह अन्य मुंबईकरांनाही लक्षात राहतील अशा अनेक घडामोडी सरत्या वर्षात शिक्षण क्षेत्रात घडल्या आहेत.
मुंबई : विद्यार्थ्यांसह अन्य मुंबईकरांनाही लक्षात राहतील अशा अनेक घडामोडी सरत्या वर्षात शिक्षण क्षेत्रात घडल्या आहेत. शालेय शिक्षणासह महाविद्यालयीन क्षेत्राने आॅनलाइनची कास धरली. हा बदल सकारात्मक असला तरीही यात येणा-या तांत्रिक अडचणींमुळे हे वर्ष ‘लेटमार्क’मुळे गाजले. तसेच, यंदा मुंबई विद्यापीठाच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यपालांनी कुलगुरूंची हकालपट्टी केली. त्यामुळे गेल्या पाच महिन्यांपासून विद्यापीठाचा कारभार हा प्रभारींच्या खांद्यावर आहे.
मुंबई विद्यापीठात गेल्या तीन वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासण्यात येत आहेत. पण यंदा अन्य अभ्यासक्रमाच्या परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासण्याचा निर्णय घेण्यात आला. निविदा प्रक्रियेला अत्यल्प प्रतिसाद मिळूनही मेरीट ट्रॅक कंपनीला हे काम देण्यात आले. यासाठी नियमात बदल करण्यात आल्याचीही माहिती कालांतराने पुढे आली होती.
उत्तरपत्रिकांवरील कोडचा घोळ झाल्याने स्कॅनिंग प्रक्रियेतच गोंधळ उडाला. त्यानंतर पायाभूत सुविधा आणि प्राध्यापकांच्या प्रशिक्षणाच्या अभावामुळे उत्तरपत्रिका तपासणी उशिरा सुरू झाली. त्यामुळे निकाल लागण्यास सप्टेंबर उजाडला. लाखो विद्यार्थ्यांचे करिअर, नोकरी पणाला लागली होती. हा अभूतपूर्व गोंधळ अद्यापही सुरू आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत झालेल्या परीक्षांचाही निकाल आॅनलाइन पद्धतीने लावण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन वर्षातही विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अकरावी प्रवेशालाही आॅनलाइन पद्धत गेल्या दोन वर्षांपासून राबण्यात येत आहे. पण, यंदाही आॅनलाइनमध्ये झालेल्या गोंधळामुळे अकरावी प्रवेशालाही लेटमार्क लागला.
>सात वर्षांनंतर
सिनेट निवडणुका
मुंबई विद्यापीठात गेल्या सात वर्षांपासून सिनेट निवडणुका झालेल्या नव्हत्या. पण, राज्यात नवीन विद्यापीठ कायदा २०१७मध्ये लागू करण्यात आला. त्यानंतर सात वर्षांनी पहिल्यांदाच सिनेट निवडणुकांची तयारी सुरू करण्यात आली. त्यालाही लेटमार्क लागला आहे. आता विद्यापीठात उत्साहाने निवडणुक प्रक्रिया सुरू आहे.
>कुलगुरूंची हकालपट्टी
मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष आहे. १६० वर्षांच्या इतिहासात न घडलेली घटना यंदाच्या वर्षात घडली. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीला लागलेल्या लेटमार्कमुळे या प्रकरणात राज्यपाल विद्यापीठाचे कुलपती यांनी लक्ष घातले. विद्यापीठाला तीन डेडलाइन दिल्या. पण, त्यातही निकाल लावण्यास असमर्थ ठरल्यामुळे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांना सक्तीच्या रजेवर पाठवून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्याचे उत्तर कुलगुरूंनी दिले. पण, समाधानकारक उत्तर न मिळाल्याने २४ आॅक्टोबर रोजी कुलगुरूंची पदावरून हकालपट्टी केली.
>डिजिटल लॉकर : मुंबई विद्यापीठात शिकून अनेक विद्यार्थी हे परदेशात अथवा देशातील अन्य राज्यांत स्थायिक झाले आहेत. त्यांना विद्यापीठातील प्रमाणपत्र अथवा गुणपत्रिका हवी असल्यास विद्यापीठात येण्याशिवाय पर्याय नसायचा. पण, विद्यापीठाने १६०वे वर्ष म्हणून डिजिटल लॉकर सुरू केले. अनिल अंबानी यांचा विद्यापीठात पहिला डिजिटल लॉकर सुरू करण्यात आला.
>पेपरफुटी प्रकरणे : बारावीची परीक्षा सुरू झाल्यावर वाणिज्य शाखेचा सेक्रेट्रीयल पॅ्रक्टिस हा पेपर फुटला. या प्रकरणात पोलिसांनी चार जणांना अटक केली. बारावीच्या परीक्षेदरम्यान विज्ञान शाखेचा फिजिक्सचा पेपर फुटल्याची अफवा पसरली होती. पण, बोर्डाने या वृत्ताला दुजोरा दिला नाही. आॅनलाइन आलेला पेपर आणि प्रत्यक्ष पेपरमध्ये तफावत असल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठाच्या परीक्षा सुरू झाल्यावर बीएमएसचा एक पेपर फुटला. भरारी पथके आणि अन्य सुरक्षा यंत्रणा असूनही पेपर फुटल्याने विद्यापीठाचा ताण वाढला होता. या प्रकरणी विद्यार्थ्यांसह अन्य कर्मचाºयांना पोलिसांनी अटक केली.
>विद्यापीठाने केली शुल्कवाढ
मुंबई विद्यापीठाच्या निकालांना लेटमार्क लागूनही विद्यापीठाने पुनर्मूल्यांकनाच्या शुल्कात दुपटीने वाढ केली होती. त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले होते. विद्यापीठात अनेक विद्यार्थी संघटनांनी आंदालने केली. त्यानंतर विद्यापीठाने माघार घेत शुल्कवाढ मागे घेतली.
>कलागुणांना कात्री : यंदा दहावीच्या परीक्षेत तब्बल ९३ जणांना १०० टक्के गुण मिळाले. विद्यार्थ्यांना कलेचे गुण मिळत असल्याने अनेक विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळायला लागले आहेत. राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात. पण, अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळतात. त्यामुळे राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांना बेस्ट ५ आणि कलागुणांचा आधार देण्यात आला होता. पण, यंदा या गुणांना कात्री लावण्यात आली आहे.
>१३१२ शाळा बंद : गेल्या काही वर्षांपासून पालक इंग्रजी माध्यमाच्या शाळांना पसंती देत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यात अन्यभाषिक माध्यमांच्या तब्बल १ हजार ३१२ शाळा या कमी पटसंख्या असल्यामुळे बंद करण्यात आल्या.
>नैदानिक चाचणीलाही लेटमार्क
इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्र्थ्यांसाठी राज्यभरात नैदानिक चाचणी घेतली जाते. यंदा या चाचणीलाही लेटमार्क लागला. तसेच, मुंबईत या चाचणीला गोंधळ उडाला. कारण, एकाच दिवशी एकाच वेळी परीक्षा घेण्याचा नियम असल्याने दोन सत्रात भरणाºया शाळांची पंचाईत झाली होती.
>वेतनश्रेणी, निवडश्रेणीतील बदल
शिक्षकांना १२ आणि २४ वर्षांनंतर देण्यात येणाºया बढती म्हणजे वेतनश्रेणी आणि निवडश्रेणीतील नियमांत बदल करण्यात आले. यामध्ये शाळेचा निकाल ८० टक्क्यांच्या वर हवा, शाळेत सुविधा हव्यात असे निकष ठरविण्यात आले. त्यामुळे शिक्षकांमध्ये
नाराजी आहे.
>वैद्यकीय प्रवेश
यादीत गोंधळ
वैद्यकीय प्रवेशासाठी नीट लागू करण्यात आली. त्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांचा चांगलाच गोंधळ झाला होता. पण, तरीही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पण, प्रवेश यादीमध्ये विद्यार्थ्यांची नावे दोनदा आल्यामुळे गोंधळ उडाला होता. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या संचालकांकडे विद्यार्थी आणि पालकांनी तक्रारी नोंदवल्यावर अतिरिक्त नावे यादीतून काढण्यात आली.
>शिक्षकांना प्रोत्साहनासाठी
महापौर पुरस्कार
महापालिका शाळांचा दर्जा सुधारावा, शिक्षकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी महापौर पुरस्कारातील नियमांमध्ये बदल करण्यात आले. ज्या शिक्षकांची आणि शाळांची कामगिरी चांगली असेल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. पण, ज्या शाळांची कामगिरी चांगली नाही, अशा शाळांना दंड ठोठवण्यात येणार आहे.
>शुल्क नियंत्रण कायद्यात प्रस्तावित बदल
गेल्या काही वर्षांत शालेय शिक्षणात बदल झाले आहेत. त्यामध्ये खासगी शाळांची संख्या वाढल्याने व्यावसायिकरण वाढले आहे. राज्याचे शुल्क वाढीचे नियम झुगारून खासगी शाळा शुल्कवाढ करतात. यामुळे पालक त्रस्त झाले आहेत. यासाठी आता राज्यभरातील पालक एकत्रित आले आहेत. यामुळे आता शुल्क नियंत्रण कायद्यात प्रस्तावित बदल करण्यात आले आहेत. शुल्क समितीत पालकांची संख्या वाढवण्यात आली आहे.