Join us

मुंबईतील पहिल्या सिग्नल शाळेला लेटमार्क; आचारसंहितेचा फटका : नोव्हेंबरपर्यंत प्रतीक्षा 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2024 10:44 AM

पूर्व उपनगरातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल येथे महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई : पूर्व उपनगरातील सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्त्याच्या उड्डाणपुलाखाली अमर महल येथे महापालिका प्रशासनाकडून मुंबईतील पहिली सिग्नल शाळा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या प्रकल्पाला विलंब झाला आहे. नियोजन विभागाने आता या शाळेच्या बांधकामाची फाइल पुढे सरकवली आहे. त्यामुळे ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत ही शाळा सुरू होण्याची अपेक्षा आहे. या शाळेसाठी मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

मुंबईतील विविध उड्डाणपुलांखाली स्थलांतरित, बेघर, गरीब कुटुंबे वास्तव्यास आहेत. ते मुला-बाळांसह सिग्नल तसेच परिसरात लहान-मोठ्या वस्तू विकून आपला उदरनिर्वाह करतात. या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी मिळावी, यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही मुंबईतील बेघर मुलांसाठी शैक्षणिक व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त केली होती. त्याची दखल घेत पालिकेने साधारणपणे ६० ते १०० विद्यार्थ्यांच्या क्षमतेची सिग्नल शाळा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिकाधिक अद्ययावत सुविधा तसेच त्यांच्या प्रगती सोबतच कुटुंबाच्या सामाजिक प्रगतीसाठी पालिका प्रयत्नशील आहे, अशी माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

सिग्नल शाळेत शिकणारी मुले ही पदपथ आणि रस्त्यांवर दिवस काढून, तिथे वेगवेगळ्या गोष्टी विकून पोट भरणारी असणार आहेत. त्यामुळे या शाळांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना सर्वात आधी या मुलांच्या पालकांचे प्रबोधन करावे लागणार आहे. या मुलांना शाळेत पाठवणे आणि शिक्षण देणे का आवश्यक आहे? त्याची प्रक्रिया काय असेल? महत्त्व काय याची माहिती देऊन त्यांच्या संमतीने या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणावे लागणार आहे. त्यासाठी या कर्मचाऱ्यांनाही तसे प्रशिक्षण देण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

ठाण्याच्या धर्तीवर उपक्रम-

१) स्थलांतरित किंवा बेघर कुटुंबीय व त्यांची लहान मुले ही प्रसंगी उदरनिर्वाहासाठी सिग्नल, उड्डाणपुलाखाली तसेच चौकाच्या ठिकाणी उघड्यावर वास्तव्य करत असल्याचे आढळते. 

२) समर्थ भारत व्यासपीठ स्वयंसेवी संस्थेने २०१८ मध्ये ठाणे येथील तीनहात नाका येथे सिग्नल शाळा सुरू केली होती.

३) सिग्नलजवळील बेघर विद्यार्थ्यांना एकत्र आणून या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी ही संस्था चांगले काम करत आहे. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकालोकसभा निवडणूक २०२४आचारसंहिताशाळा