वन्य प्राण्यांनासुद्धा आपल्याइतकाच जगण्याचा अधिकार आहे; मदतीची, आधाराची गरज आहे !
सचिन लुंगसे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वन्य प्राण्यांनासुद्धा आपल्याइतकाच जगण्याचा अधिकार आहे. वन्य प्राण्यांना आपल्या मदतीची, आधाराची गरज आहे. त्यामुळे आपल्याला वन्यजीवांच्या व्यवस्थापनामध्ये जेवढी मदत करता येईल तेवढी करूया. देखभाल करूया. वाघ, बिबट्या किंवा इतर प्राणी दत्तक घेऊया. वन्य प्राणी दत्तक योजनेत मुंबईकरांना जेवढी मदत करता येईल तेवढी करूया आणि बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वन्य प्राणी दत्तक योजनेत सहभागी होऊया, असे आवाहन उद्यानाचे वन अधिकारी विजय बारब्दे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीतून नागरिकांना केले.
१) योजनेची सुरुवात कशी झाली ?
भारतात अनेक ठिकाणी वन्यप्राणी दत्तक योजना राबवली जाते. जिथे-जिथे प्राणी संग्रहालये आहेत किंवा जिथे रेस्क्यू सेंटर आहेत तिथे ही योजना राबवली जाते. महाराष्ट्रात २०१३ साली ही योजना प्रथमत: राबवली गेली. ज्या लोकांना वन्यजीवांबद्दल प्रेम आणि आपुलकी आहे, निसर्गप्रेम, सहानुभूती आहे, त्यांचे योगदान या योजनेत लाभावे या उद्देशाने ही योजना राबविण्यात आली. वन्यजीवांच्या संवर्धनासाठी संपूर्ण देशात, राज्यात या योजनेला महत्त्व दिले गेले. याद्वारे व्यक्ती, संस्थांनी योजनेत सहभाग घेण्यास सुरुवात केली. वन्यजीव व्यवस्थापनात यांचा सहभाग वाढावा म्हणून योजना सुरु करण्यात आली.
२) योजनेला प्रतिसाद कसा आहे ?
राज्य सरकारच्या देखरेखीखाली प्राणी दत्तक योजना राबवली जाते. २६ डिसेंबर २०१३पासून बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने ‘प्राणी दत्तक योजना’ राबविण्यास सुरुवात केली. तेव्हापासून इच्छुकांनी आपला सहभाग नोंदविण्यास सुरुवात केली. आठ वर्षे झाल्याने लोकांच्या विस्मरणात ही योजना गेली होती. त्यामुळे आमचे अधिकारी विरेंद्र तिवारी यांनी पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून योजनेला बळकटी दिली. मुंबईकरांनी फार उत्तम प्रतिसाद योजनेला दिला आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रजातीचे सुमारे सत्तर प्राणी दत्तक घेण्याकरिता आहेत. सगळ्या प्राण्यांसाठी अर्ज येऊन गेले आहेत. चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या कुटुंबीयांसह सतीश वाघ फाऊंडेशन, समाजसेविका साधना वझे, क्रिकेटर संदीप पाटील, राजकीय क्षेत्रातील रामदास आठवले, रामदास कदम, प्रताप सरनाईक यांनी वन्य प्राणी दत्तक घेतले आहेत.
३) प्राणी कसे दत्तक घेतले जातात ?
एक प्राणी दत्तक घेता येतो. प्राणी दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला प्रमाणपत्र दिले जाते. ते प्रमाणपत्र त्या प्राण्याच्या पिंजऱ्याबाहेर लावले जाते. शिवाय ज्याने जो प्राणी दत्तक घेतला आहे त्या व्यक्तीला संबंधित प्राण्याचे व्यवस्थापन पंधरा दिवसांकरिता बघता येते. यामध्ये पिंजऱ्याची सफाई कशी केली जाते, निगा कशी राखली जाते. या कामातले कौशल्य, धोका अशा सर्व गोष्टी व्यवस्थापनात प्राणी दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला बघता येतात. आठ वर्षांत योजनेला उत्तम प्रतिसाद मिळाला. सुरुवातीला दोन वर्षे तर तुफान प्रतिसाद मिळाला.
४) नवीन काही योजना आहेत ?
ज्यांना प्राणी दत्तक घेता आले नाहीत त्यांना प्राण्यासाठीच्या साहित्यात गुंतवणूक करता येते. या माध्यमातून मदत करता येते. प्राण्यांच्या खाद्याकरिता मदत करता येते. ही योजना प्रस्तावित आहे. प्राणी दत्तक योजनेचे फलित म्हणजे शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. अपेक्षापेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातला माणूस येथील प्राणी दत्तक घेऊ शकतो. आता योजनेला पुन्हा चैतन्य आले आहे. या माध्यमातून प्राण्यांचे संवर्धन होते. विशेष म्हणजे एखाद्या प्राण्याच्या देखभालीसाठी जो खर्च येतो त्याच्या केवळ ३५ ते ४० टक्के रक्कम संबंधित व्यक्तीकडून घेतली जाते.