आधी सत्ताधाऱ्यांचा उमेदवार ठरू द्या! राष्ट्रपतीपदाबाबत शरद पवारांचे मत

By Admin | Published: April 29, 2017 03:18 AM2017-04-29T03:18:32+5:302017-04-29T03:18:32+5:30

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्याबाबत समविचारी विरोधी पक्षांनी सबुरीने घ्यावे. आधी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार ठरू द्यावा

Let's be the candidate of the ruling party! Sharad Pawar's opinion about the post of President | आधी सत्ताधाऱ्यांचा उमेदवार ठरू द्या! राष्ट्रपतीपदाबाबत शरद पवारांचे मत

आधी सत्ताधाऱ्यांचा उमेदवार ठरू द्या! राष्ट्रपतीपदाबाबत शरद पवारांचे मत

googlenewsNext

हरिश गुप्ता / नवी दिल्ली
राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरविण्याबाबत समविचारी विरोधी पक्षांनी सबुरीने घ्यावे. आधी सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा उमेदवार ठरू द्यावा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सांगितल्याचे समजते.
जुलैमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी भाजपाविरोधी आव्हान उभे करण्यासाठी सोनिया स्वत: पुढाकार घेऊन विविध नेत्यांशी चर्चा करीत आहेत. आतापर्यंत त्यांनी सीताराम येचुरी, नितीशकुमार, शरद यादव आणि अन्य नेत्यांची भेट घेतली आहे. लालूप्रसाद यादव, डी. राजा, एम. के. स्टॅलिन यांच्याशीही या अनुषंगाने त्या फोनवरून बोलल्या आहेत. या पदासाठी गोपालकृष्ण गांधी आणि शरद यादव यांची नावे चर्चेत आहेत.
या पार्श्वभूमीवर पवार यांनी बुधवारी सोनिया यांची भेट घेऊन या मुद्द्यासह सध्याच्या राजकीय स्थितीवर अर्धा तास चर्चा केली होती. उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पवार या मुद्द्यावर अगदीच स्पष्ट बोलले. तुमच्या मनात राष्ट्रपतीपदासाठी कोणी उमेदवार आहे का? त्यावर त्या म्हणाल्या की, अद्याप कोणीही नाही. राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षाने उमेदवार का द्यावा? उमेदवार देण्यामागचा हेतू स्पष्ट असावा. सत्तारूढ पक्षाने या पदासाठी उमेदवार घोषित करेपर्यंत आपण वाट बघावी, असे तुम्हाला वाटत नाही का? असे पवार यांनी सोनिया यांना सांगितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
भाजपाच्या मुसंडीने प्रत्येक राज्यात विरोधी पक्षात गोंधळ असून, आधी त्यांनी आपापली स्थिती सावरली पाहिजे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) उमेदवार ठरल्यानंतरच काँग्रेसने चाल चालावी, असे पवार यांचे मत आहे. 
भाजपाकडून कोणत्याही हालचाली नसताना विरोधी पक्षांनी संयुक्त उमेदवाराबाबत गाजावाजा करण्यास पवार यांचा विरोध आहे. 
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आपण नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केलेले आहे, तसेच महाराष्ट्रातील स्थानिक संस्थांच्या निवडणुकीतही शक्य त्या ठिकाणी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. नजीकच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचा राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काँग्रेससोबत हातमिळवणी करण्याचा विचार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा विरोधी पक्षनेत्यांची बहुधा मेअखेर बैठक घ्यावी, असा निर्णय झाला आहे.

Web Title: Let's be the candidate of the ruling party! Sharad Pawar's opinion about the post of President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.