मुंबई - शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळे आहे. या घटनेमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, सध्या शिवसेनेत सुरू असलेल्या घडामोडींवरून मनसेचे नेते शिवसेना आणि सेना नेतृत्वावर सातत्याने टीका करत आहेत. त्यातच शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुखांप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी सध्या शिवसेनेत पदाधिकारी आणि शिवसैनिकांकडून लिहून घेण्यात येत असलेल्या प्रतिज्ञापत्रांची मनसेने खिल्ली उडवली आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक चित्र ट्विट करत प्रतिज्ञापत्रांवरून उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे एक व्यंगचित्र शेअर केले आहे. त्यामध्ये हातात प्रतिज्ञापत्रांची कागदपत्रं घेऊन उद्धव ठाकरे बसले आहेत. टीव्हीवर एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आम्हीच खरी शिवसेना असे म्हणताना दिसत आहेत. तर आदित्य ठाकरे त्यांच्याकडे येऊन त्यांना एक कल्पना सुचवत आहेत. त्यात ते वडील उद्धव ठाकरेंना सांगतात की, बाबा, एक आयडिया सुचली आहे. आपण शिवसैनिकांच्या शिवबंधन व प्रतिज्ञापत्रांऐवजी त्यांना जीपीएस ट्रॅकरच बांधूया. आदित्य ठाकरे यांच्या या कल्पनेकडे उद्धव ठाकरे अवाक होऊन पाहत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी बंड करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होण्यासाठी भाग पाडल्यानंतर पक्षसंघटना आपल्याकडे टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता शिवबंधनानंतर शिवसैनिकांना आपण शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्याचं प्रतिज्ञापत्र लिहून द्यावं लागणार आहे. या अभियानाची सुरुवात राज्यातील अनेक ठिकाणी झाली आहे.
दरम्यान, दोन दिवसांच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अध्यक्षीय निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव झाला. तर शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांचं नाव कायम ठेवलं आहे. तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांच्या नावाला मान्यता दिली आहे.