Join us

इको फेंडली गणेशोत्सव साजरा करू या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:08 AM

मुंबई : अवघ्या मुंबापुरीवर गणेशोत्सवाचा माहोल आहे. काेनाकोपरा श्रीगणेशाच्या भक्तीत आता रंगून जाणार आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना ...

मुंबई : अवघ्या मुंबापुरीवर गणेशोत्सवाचा माहोल आहे. काेनाकोपरा श्रीगणेशाच्या भक्तीत आता रंगून जाणार आहे. मात्र हा उत्सव साजरा करताना आपण पर्यावरणाचे भान राखू या आणि इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करू या, असे आवाहन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.

गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला आहे. या वर्षी फक्त पर्यावरपूरक मूर्ती व साहित्य घरी आणू या, असे मंडळाने म्हटले आहे. तर गणेशोत्सव साजरा करताना कोणताही प्रकारचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेऊ या, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे. याव्यतिरिक्त मुंबईतल्या विविध सेवाभावी संस्थांनीदेखील मुंबईकरांना कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे.

पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे, विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जनस्थळी विसर्जन करण्यात यावे. आरोग्यविषयक उपक्रम / शिबिरे आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे. त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे आवाहन सरकारने केले आहे.

महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने गणेशमूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जनस्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/ इमारतींतील सर्व घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरीत्या काढण्यात येऊ नये, असे आवाहनदेखील सरकारने केले आहे.