चला, इकोफ्रेंडली होळी साजरी करूया
By admin | Published: March 11, 2017 03:53 AM2017-03-11T03:53:33+5:302017-03-11T03:53:33+5:30
पर्यावरणपूरक रंगांचा वापर करत इकोफ्रेंडली होळी-रंगपंचमी साजरी करण्याचा निर्धार मुंबईकरांनी केला आहे. विशेषत: पर्यावरणचा विचार करत मुंबईकरांनी कृत्रिम रंगांना
पर्यावरणपूरक रंगांचा वापर करत इकोफ्रेंडली होळी-रंगपंचमी साजरी करण्याचा निर्धार मुंबईकरांनी केला आहे. विशेषत: पर्यावरणचा विचार करत मुंबईकरांनी कृत्रिम रंगांना दोन हात लांबच ठेवले आहे. होळीसह रंगपंचमीला कमीतकमी पाण्याचा वापर करण्याबाबतचे संदेशही यानिमित्ताने जनमनात रुजवले जात आहेत. विशेष बाब म्हणजे हे सामाजिक भान जपणारी तरुणाई असून, अशाच काहीशा पर्यावरणस्नेही तरुणाईने मुंबईकरांना ‘चला, इकोफ्रेंडली होळी साजरी करुया...’ असे आवाहन या निमित्ताने केले आहे.
मुंबई : होळीसाठी मुंबईकरांनी झाडे अथवा झाडांच्या फांद्या तोडू नयेत. तसेच मुंबईकरांनी धुलिवंदनाकरीता पाण्याचा वापर टाळावा, असे आवाहन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. ‘धुलिवंदन’ हा सण सर्व जाती धर्माच्या लोकांना एकाच धाग्यात गुंफणारा सण असून नवचैतन्य निर्माण करणारा आहे. मुंबईकर नागरिकांनी आपल्याच राज्य बांधवाबद्दल एक सहृदयता आणि सामाजिक बांधिलकी म्हणून या दिवशी पाण्याचा गैरवापर टाळावा. पर्यावरणपूरक नैसर्गिक रंगाचा वापर करावा. पाण्याचे व रंगाचे फुगे एकमेकांवर मारण्याचे टाळून होळी हा सण कोणतेही गालबोट न लागता आपापसात सलोख्याचे संबंध वृद्धिंगत करणारा म्हणून साजरा करावा, असे आवाहनही महापौरांनी मुंबईकरांना केले आहे.
वसंत ऋतूमधला हा सण आनंदाने साजरा करूया. या आनंदाला कृत्रिम रंगाचे गालबोट नको लावायला. नैसर्गिक रंगाने इकोफ्रेंडली होळी साजरी करूया.
- मृणाल पाटील, दादर
होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचे दहन करून चांगल्या गोष्टींचा संकल्प करणे. मग त्याकरता वृक्षतोड करून लाकडे जाळणे किंवा गवत पेटवून धूर आणि प्रदूषण वाढवणे या गोष्टी टाळता येतात. एका चांगल्या गोष्टीमुळे अनेक फायदे होणार असतील तर चला या वर्षीची होळी पर्यावरणस्नेही बनवूया.
- सावनी गोगटे, गिरगाव
होळीला रंगांची उधळण केली जाते, पण ते रंग उधळताना त्याचा आपल्या शरीराला आणि पर्यावरणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. होळी खेळून झाल्यावर जी अस्वच्छता होते त्याचेसुद्धा नियोजन व्हायला हवे.
- वृषाली पिंगुळकर, गिरगाव
आपल्याकडे पाण्याची भीषण टंचाई आतापासूनच पाहायला मिळते. होळीला वापरण्यात येणाऱ्या रंगात मोठ्या प्रमाणात शरीराला नुकसान करणारे घटक असतात. याचे भान राखून जर आपण सुरक्षित होळी साजरी केली पाहिजे.
- जयती शिगवण, जोगेश्वरी
होळी हा पूर्वापार चालत आलेला सण आहे. होळीला वाईट गोष्टींचे दहन केले जाते. या सणाला कोणीही व्यसन करून सण साजरे करू नये. सगळ्यांनी इकोफ्रेंडली होळी साजरी करावी.
- मितेश घाडी, ताडदेव
आजकालच्या केमिकल युगात इकोफ्रेंडली होळीला माझा पाठिंबा आहे. पूर्वीचे लोक नैसर्गिक वस्तूचा (गुलालाचा आणि फुलांच्या पाकळ्यांचा) वापर करून होळी साजरी करत होते. आजच्या युवा पिढीला हे पटवून देणे खूप गरजेचे आहे.
- जानकी नारकर, वडाळा
होळी हा सण प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरणारा आणि मुख्य म्हणजे आपल्या दगदगीच्या जीवनात लोकांना जवळ आणणारा हा गोड उत्सव आहे. पण होळी आणि रंगपंचमी साजरी करताना पर्यावरणाची हानी होतेय. पर्यावरणाला हानी पोहोचता कामा नये याकडे लक्ष दिले पाहिजे.
- तेजश्री परब, जोगेश्वरी
फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. होळी हा सण शहरात तसेच खेड्या-पाड्यातून मोठ्या आनंदात आणि उत्साहाने साजरा केला जातो. पण कृत्रिम रासायनिक रंगांचा, अंड्याचा, पिशव्यांचा बेशिस्तपणे वापर केला जातो. या कारणामुळे पर्यावरणाला व माणसाला त्रास होतो. म्हणून स्वत:ची काळजी घेऊन होळी खेळली पाहिजे.
- शरयू पाटील, जोगेश्वरी
रंगपंचमीनंतर प्लास्टिक पिशव्यांचा कचरा सर्वत्र दिसून येतो. प्लास्टिक पर्यावरणासाठी हानीकारक आहे. याची काळजी घेत इकोफ्रेंडली होळी साजरी करणे महत्त्वाचे आहे.
- नीलाक्षी पाटील, वरळी कोळीवाडा
कृत्रिम रंगापेक्षा नैसर्गिक रंगाचा वापर केला पाहिजे. जर नैसर्गिक रंग नसेल तर चांगल्या रंगाचा वापर केला पाहिजे. पाण्याचा पण विचार केला पाहिजे.
- प्रतिज्ञा शिंदे, मालाड
गुलाबी रंग जास्त काळ अंगावर टिकून राहतो आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. म्हणून इकोफ्रेंडली होळी साजरी करायला हवी.
- अनिकेत कोरगावकर, वरळी
नैसर्गिक रंगांमुळे शरीरावर कोणत्याही प्रकारची इजा होत नाही. त्यामुळे सर्वांनी इकोफ्रेंडली होळी साजरी केली पाहिजे.
- ऋषिकेश गोल्लार, लोअर परळ
पाण्याचा गैरवापर, रासायनिक रंगांच्या वापरामुळे चेहऱ्यावर होणाऱ्या बाधा, अशा घडणाऱ्या गोष्टींमुळे सर्वांना त्रास होतो. म्हणून इकोफ्रेंडली होळी साजरी करणे खूप महत्त्वाचे आहे.
- अक्षय परब, भायखळा
पर्यावरणाशी नाते जपणारा रंगोत्सव म्हणजे होळी. या इकोफ्रेंडली रंगांची मज्जाच काही वेगळी असते. या रंगांचा आनंद लुटताना एक नवा गंध, निरागस आरोग्य स्फूर्ती जपणारे आणि निसर्गाच्या या रंगात हळुवार जपणारी संस्कृती आजही जतन केली जाते आणि ती जपली पाहिजे.
- अमृता सोनावणे, सायन
होळीमध्ये रंग व पाण्याचा उपयोग मोठ्या प्रमाणावर केला जातो. फुगे किंवा त्वचेला हानी पोहोचवतील असे रंग वापरू नयेत. त्याऐवजी कोरडी होळी खेळावी.
- चेतन शिंदे, दादर
होळी सांस्कृतिक पद्धतीने साजरी केली पाहिजे. म्हणजेच गुलालाचा वापर करून कोरडी होळी खेळली पाहिजे.
- विजय मोझर, अंधेरी
नैसर्गिक रंगाने होळी खेळावी. त्याने कोणत्याही प्रकारची इजा होत नाही.
- रूपाली कारंडे, कांदिवली
होळी खेळताना रंगांचा किंवा पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर करणे गरजेचे नाही. रंगाचा टिळा लावूनदेखील होळी साजरी करता येते.
- पूर्णिमा वनकर, कांदिवली
होळी हा सण आपल्या आयुष्यात अनेक रंग घेऊन येतो. पर्यावरणाला धोका निर्माण होणार नाही अशा प्रकारे होळी साजरी करा.
- तेजस शिंदे, जोगेश्वरी
होळी आपला पारंपरिक सण आहे. पण त्यात काळानुसार पारंपरिक किंवा नैसर्गिक रंगाऐवजी रासायनिक रंग वापरले जातात. परंतु काही संस्था, समाज माध्यम यांच्या जागरूकतेमुळे समाजात बदल होत आहे. त्यामुळे होळी किंवा इतर सण साजरे करताना निसर्गाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.
- आरती भरगुडे, कांदिवली
होळी अतिशय उत्साहाने साजरा होणारा सण आहे. पण होळीचा रंग निसर्गाला खूप धोकादायक आहे. होळी खेळावी पण नैसर्गिक रंगांचा वापर करून.
- मंदार जाधव, दादर
सणांमधून आपल्या संस्कृतीचे जतन केले जाते. होळी या सणामध्ये द्वेष, राग आणि मत्सर जाळून टाका. पर्यावरण संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी इकोफ्रेंडली होळी साजरी केली पाहिजे.
- राहुल कोकरे, खार रोड
होळी नैसर्गिक रंगांनी खेळली पाहिजे. पाण्याचा कमी वापर करून आणि कृत्रिमपेक्षा नैसर्गिक रंगांनी होळी साजरी केली पाहिजे.
- मेघा मोहिते, अंधेरी
इकोफ्रेंडली होळीचे आयोजन सर्व परिसरात करायला हवे जेणेकरून सर्वांना होळीचा आनंद घेता येईल.
- ज्ञानेश झुजम, दादर
इकोफ्रेंडली होळीची आता गरज निर्माण झालेली आहे. दुष्काळग्रस्त भागात लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत आणि शहरात मात्र पाण्याचा अपव्यय केला जात आहे. परंतु आपली सामाजिक बांधिलकी म्हणून तरी इकोफ्रेंडली होळी साजरी करणे आवश्यक आहे.
- तेजल सप्रे, दादर
(संकलन : सागर नेवरेकर, प्राचिता हरळय्या, अंकिता सणस, ऐश्वर्या गडकरी)