चला, प्रबोधनात्मक गणेशोत्सव साजरा करूया...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 02:09 AM2019-09-02T02:09:04+5:302019-09-02T02:09:56+5:30
महापालिकेचे आवाहन : उत्सवाचे पावित्र्य जपत, सामाजिक भान राखत गणरायाची आरास करा
मुंबई : लालबागपासून मुलुंडसह दहिसरपर्यंतची मुंबापुरी गणेशोत्सवात रंगली आहे. घरोघरी श्रीगणेशाचे आगमन झाले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीही मंडपात दिमाखात विराजमान झाल्या आहेत. बाजारपेठा उत्साहाने भरल्या आहेत. खरेदी-विक्रीला झुंबड उडाली आहे. दहा दिवस आता मुंबापुरीत केवळ ‘गणपती बाप्पा मोरया...’ असाच जयघोष ऐकू येणार आहे. मुंबापुरी श्रीगणेशाच्या चरणी भक्तीरसात तल्लीन होणार आहे. अशाच काहीशा उत्साही उत्सवाचे पावित्र्य जपत मुंबईकरांनी सामाजिक भान राखत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
सार्वजनिक आरोग्याबाबत प्रत्येकाने आपल्या विभागात उंदीर, डास इत्यादींचा उपद्रव होणार नाही याची काळजी घ्यावी. जेणेकरून साथीच्या आजारांचा फैलाव होणार नाही. मोकळ्या जागेवरील माती, कचरा काढून घेण्याची काळजी घ्यावी. जेणेकरून संपूर्ण गणेशोत्सवात स्वच्छता राहील. आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. प्रत्येक मंडळाने कचरा साठविण्याची व्यवस्था वेगळी करावी. मंडपाच्या बाजूचा परिसर, रस्ते, विसर्जनाची ठिकाणे स्वच्छ ठेवावी. वाहतूक, पादचारी व इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडळाच्या ठिकाणी ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी घ्यावी. मंडपाच्या परिसरात महापालिकेने तयार केलेली लोकोपयोगी भित्तीपत्रके, कापडी फलक आणि समाजोपयोगी माहितीपत्रके प्रदर्शित करावीत. आग शमविण्यासाठीचे साहित्य सहज उपलब्ध होईल, अशा रीतीने ठेवावे. उत्सवाच्या काळात मावा आणि माव्यापासून पदार्थ बनविले जातात. हे पदार्थ शिळे असतील तर ते तपासूनच खरेदी करावेत. गणेशोत्सवात मंडप परिसरात मोठ्या प्रमाणावर फेरीवाले खाद्यपदार्थांची विक्री करतात. त्यांना प्रतिबंध करावा, असे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.
अशी केली आहे भाविकांची व्यवस्था
मुंबईकरांनी उत्साहात लाडक्या बाप्पाचे स्वागत केले़ अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने जल्लोषात गणेशाचे आगमन केले़
च्ज्या पदार्थापासून खत तयार करता येणे शक्य नाही, असे पदार्थ वेगळ्या डब्यात जमा करावे.
च्घरगुती आणि मंडपांत संकलित होणारे निर्माल्य महापालिकेच्या निर्माल्य वाहनास हस्तांतरित करावे.
च्निर्माल्य गोळा करून त्याचे वर्गीकरण करावे.
च्महापालिकेने चौपाट्यांसह गणेश विसर्जन स्थळांवर सर्व सुविधांनी युक्त व्यवस्था आहे.
च्सुविधांमध्ये त्रुटी राहू नये म्हणून चौपाट्या, विसर्जनस्थळांची पाहणी झाली आहे.
च्गणेशोत्सव पाहण्यास देश-विदेशातील पाहुणे गिरगाव चौपाटी येथे येतात.
च्विसर्जनस्थळांवर अतिरिक्त तराफे, बोटी, जीवरक्षक, स्टील प्लेट्स, मोटरबोट, प्रथमोपचार केंद्र व रुग्णवाहिका, तात्पुरती शौचालये, जर्मन तराफा, सर्च लाइट, स्वागत कक्ष ही व्यवस्था प्रशासनाने केली आहे.
च्गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम चौपाटी, जुहू चौपाटी, मार्वे चौपाटी, गोराई जेट्टी, पवई तलाव, भांडुपेश्वर कुंड आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरचे मोरया उद्यान तलाव यांची पाहणी करण्यात आली आहे.