मुंबई : गणेशोत्सवाच्या काळात होणारी गर्दी लक्षात घेता संसर्ग टाळण्यासाठी सरकार पुन्हा एकदा नवीन नियमावली लागू करण्याच्या विचारात आहे. यामुळे गणेशोत्सव मंडळांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.
सरकारने २९ जून रोजी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार सर्व गणेशोत्सव मंडळांनी तयारी केलेली असताना आता आयत्या वेळेला पुन्हा एकदा नवीन नियमावली जाहीर केल्यास आम्ही नेमका उत्सव साजरा तरी कसा करायचा, असा प्रश्न मंडळाच्या कार्यकर्त्यांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे जुन्या नियमावलीनुसारच नियम पाळून आम्ही गणेशोत्सव साजरा करू, या विचारावर गणेशोत्सव मंडळ ठाम आहेत.
तसेच महानगरपालिका व पोलीस प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर मंडळांना वेगवेगळ्या सूचना देण्यात येत आहेत. त्यामुळे एकाला वेगळा न्याय व दुसऱ्याला वेगळा न्याय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे जुनी नियमावली कायम ठेवावी अशी मागणी गणेशोत्सव मंडळे करीत आहेत.
नरेश दहिबावकर (अध्यक्ष - बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती)
आयत्या वेळेला पुन्हा नवीन नियमावली काढली तर मंडळांमध्ये अजून संभ्रम निर्माण होऊ शकतो. जुन्या नियमावलीचे पालन करून मंडळे उत्सव साजरा करण्यास तयार आहेत. महानगरपालिका वेगळे आदेश देते, तर पोलीसही वेगळे आदेश देतात. त्यामुळे पोलीस, महानगरपालिका व सरकार यांच्यातच समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पोलीस स्थानिक पातळीवर वेगवेगळे आदेश देत आहेत. यामुळे उत्सव साजरा करण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतील.