Join us

'नाराज नाट्य निर्मात्यांशी चर्चा करू', श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने पत्रकार परिषदेत मांडली भूमिका

By संजय घावरे | Published: January 10, 2024 3:50 PM

मुंबई - श्री शिवाजी नाट्य मंदिरमध्ये १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका घेत काही नाट्य निर्मिती संस्थांनी ...

मुंबई - श्री शिवाजी नाट्य मंदिरमध्ये १ जानेवारीपासून २३ नाटकांचे प्रयोग न करण्याची भूमिका घेत काही नाट्य निर्मिती संस्थांनी २३ डिसेंबर २०२३ रोजी वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली होती. त्यावर श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ ट्रस्टने पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडले. काही निर्मात्यांनी नाटकांचे प्रयोग न करण्याचा निर्णय घेतला असला तरी शिवाजी मंदिरमध्ये नाटकांचे प्रयोग थांबलेले नाहीत, पण नाराज नाटय निर्मात्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.

श्री शिवाजी मंदिरमधील राजर्षी शाहू सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला ट्रस्टचे अध्यक्ष ब्रिगेडीयर सुधीर सावंत, कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण, चिटणीस संतोष शिंदे, विश्वस्त अॅड. सुहास घाग आणि विश्वस्त ज्ञानेश महाराव उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सावंत म्हणाले की, निर्मात्यांनी परस्पर जाहिरात देऊन नाटकांचे प्रयोग न करण्याचे जाहिर केल्याने नाट्यगृहाची बदनामी झाली. याबाबत संबंधित वर्तमानपत्रांकडेही विचारणा केली. निर्मात्यांच्या काही मागण्या असतील, ज्या आमच्यापर्यंत आलेल्या नसतील, पण शिवाजी मंदिरमध्ये नाटक चालू आहे. काही निर्मात्यांनी शनिवार-रविवारी नाट्यगृह मिळत नसल्याचीच तक्रार पत्राद्वारे केली आहे. आम्ही नियमांनुसार तारखांचे वाटप करतो. त्यामुळे इतक्या वर्षांत कोणतीही तक्रार आलेली नाही. नाटकांना ५०० रुपये तिकिट दर लावला जात असल्याच्या प्रेक्षकांच्या तक्रारी येत असल्याने ५०० रुपये तिकिट आकारल्यास दुप्पट भाडे घेण्याचा नियम केला, पण नंतर शिथिल करून दीड पट भाडे घेण्याचा केला. तरीही इतर नाट्यगृहांच्या तुलनेत शिवाजी मंदिरचे भाडे खूप कमी आहे. जास्तीत जास्त प्रेक्षकांना कमी दरात नाटक बघण्याची संधी मिळावी यासाठी हा नियम करण्यात आला.

काही निर्मात्यांनी बहिष्कार टाकला असला तरी शिवाजी मंदिरमध्ये नाटक सुरूच आहे. निर्मात्यांशी बोलणी करून त्यांच्या तक्रारी दूर केल्या जातील. नाराज निर्मात्यांनी आपले म्हणणे मांडावे. चर्चेद्वारे तोडगा काढण्याचे आश्वासनही सावंत यांनी दिले. तिकिटांचा दर कमी करण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला असल्याने जास्तीत जास्त प्रेक्षकांना नाटक पाहता येईल असे कार्यकारी विश्वस्त बजरंग चव्हाण म्हणाले.

अष्टविनायक, प्रवेश, मल्हार, रॅायल थिएटर, बदाम राजा प्रोडक्शन, सरगम क्रिएशन, गौरी थिएटर, सोनल प्रोडक्शन या निर्मिती संस्थांनी अपेक्षित तारखा मिळत नसल्याने जानेवारी ते मार्च २०१४ या तिमाहीतील तारखा परत करत असल्याचे पत्राद्वारे कळविले, पण हि तक्रार वस्तुस्थितीला धरून नसल्याचे ट्रस्टचे म्हणणे आहे. नाटकांचे प्रयोग न करता परस्पर दुसऱ्या नाट्यसंस्थेला तारीख देण्याचा प्रकार काही नाट्य निर्माते करत असल्याचे सांगण्यात आले. प्रशांत दामले यांनी ११ नोव्हेंबर ही तारीख परस्पर अष्टविनायकला दिली. ७ नोव्हेंबरपर्यंत जाहिरात नसल्याने दामलेंना कॅाल करून विचारल्यावर त्यांनी नाटकाचा प्रयोग असल्याचे विसरून गेल्याचे महाराव यांनी सांगितले. 

यावर प्रशांत दामले यांनी प्रतिक्रिया दिली की, मागील बऱ्याच दिवसांपासून मी शंभराव्या नाट्य संमेलनाच्या आयोजनाच्या गडबडीत होतो. या संदर्भात बरीच कामे करायची असल्याने प्रयोग करणे शक्य झाले नव्हते.