- डॉ. दीपक सावंत
राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. प्रशासनाच्या दृष्टीने ही एक चिंतेचीच बाब आहे. मुख्यमंत्र्यांनी वारंवार सांगून, इशारे देऊनही जनता बेफिकिरीने वागताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषतः परभणी, संभाजीनगर, बुलडाणा, अमरावती, भंडारा, काही प्रमाणात पुणे, सिंधुदुर्ग या भागातही पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. यामुळे महाराष्ट्रात एक चिंतेचे वातावरण पसरले आहे.
..............................................
जगातील सर्वच मोठ्या राष्ट्रांत कमीअधिक प्रमाणात लॉकडाऊन सुरू आहे. कारण हा व्हायरस अधिक वेगाने पसरत आहे. आजही भारतात महाराष्ट्र आणि मुंबईत विमानाने येणारे प्रवासी हे खरेच क्वारंटाइन होतात का? क्वारंटाइन काळात ते फक्त हॉटेलातच राहतात का? हे सर्व प्रश्न मोठ्या प्रमाणावर अनुत्तरित आहेत. त्यामुळे विविध भागात हे प्रवासी व्हाया व्हाया प्रवास करून आल्याने त्यांच्या संपर्क आणि प्रवासाचा माग काढणे, हा मोठा यक्ष प्रश्न प्रशासनासमोर आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून कोविडसंबंधी प्रोटोकॉल पाहण्यासाठी जे मनुष्यबळ वापरले जाते ते बेफिकीरपणे फिरणाऱ्या, सोशल डिस्टन्सिंग न पाळणाऱ्या प्रवाशांना हटकतानाही दिसत नाही. दंड करण्याचे सोडून द्या. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे.
जोपर्यंत मास्क घातलेला नागरिक विनामास्क नागरिकाला हटकत नाही किंवा त्याला मास्क घालण्यासाठी सांगत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या त्रिसूत्रीचे पालन होणार नाही. लोक नियमांचे पालन करत नसल्याने दबा धरून बसलेला कोरोना हा हल्ला करण्याच्या पवित्र्यात आहे. मोठमोठ्या झोपडपट्ट्या, दाटीवाटीची वस्ती, सार्वजनिक प्रसानधगृहे, त्याचबरोबर सॅनिटायझर वापर करण्यास विसरणे, सोशल डिस्टन्सिंगच्या नावाने आनंदी आनंद असल्याने कोरोना पुन्हा सोकावला आहे.
आता कोरोना पुन्हा कशामुळे वाढला याचे उत्तर टीकाकारांनी देणे आवश्यक आहे. मी जरी राजकीय पक्षाचा असलो तरी असे म्हणेन की, आपल्या सर्वांचीच विविध प्रश्नांसाठी केलेली आंदोलने आवश्यक होती तरी या आंदोलनांमध्ये मास्क न घालणे, अंतर न पाळणे यांनी नकळतपणे संसर्गात भर घातली आहे. त्याचबरोबर विवाह सोहळे, ट्रिप्सला जाणे, महाबळेश्वर, माथेरान, लोणावळा, शिर्डी, अष्टविनायक, इगतपुरी यांसारख्या ठिकाणी गटागटाने जाणे, बाजारात खरेदीसाठी नव्हे तर बऱ्याचदा ‘क्या नया आया है’ या चिकित्सक वृत्तीने केलेली गर्दी, फॅमिली गेट-टुगेदर, हॉटेलवाल्यांनी धाब्यावर बसवलेली सोशल डिस्टन्सिंगची नियमावली, लग्नमंडपातील लगीनघाई या सर्वांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण पसरले आहे. सतत मास्क, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग यासाठी जागरूकता व पालन करण्यासाठी, मानसिकता बनवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी रस्त्यावर उतरून (केवळ ५-५ जणांनी) हा संदेश दिल्यास जनमानसात खूप फरक पडेल.
सगळ्यात जास्त केसेस कॅलिफोर्नियातील टेक्सासमध्ये आहेत. तसेच मृत्यूही जास्त आहेत. न्यूयॉर्क सिटी हे कोरोना संसर्गाचे केंद्र झालेले दिसत आहे. नॉर्थ डाकोटा, साउथ डाकोटा येथे प्रत्येक दोन हजार माणसांमागे एक करोना रुग्ण आहे असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. येथेही मास्क वापरण्यावरून राजकारण सुरू आहे. कारण बायडेन यांनी ‘फेस कव्हरिंग’ म्हणजेच मास्क अनिवार्य केला आहे. फक्त भारतातच नव्हे तर जगातील प्रत्येक देश मास्क वापरण्यावरून टाळाटाळ करीत आहे. मार्च २०२० अनेक देशांनी मास्क वापरण्याची शिफारस केली. त्यानंतर हळूहळू परिवर्तन होत १३० देशांनी आणि यू.एस.एस.मधील १० राज्यांनी मास्क वापरण्यासाठी हाकाटी दिली. आज इटलीमध्ये ८३ टक्के नागरिक मास्क वापरतात. अमेरिकेत ६५.८ टक्के, तर स्पेनमध्ये ६३.८ टक्के लोक मास्क वापरतात किंवा फेस कव्हरिंगचा वापर करतात. सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने हेल्थ वर्कर, डॉक्टरांना मास्क वापरण्याची सूचना केली होती. तसेच ज्यांना सर्दी, खोकला, शिंका आहेत त्यांनी मास्क वापरावा असे नियम केले होते. पण असे लक्षात आले की, कोरोनाचा संसर्ग हवेतील कणांद्वारेही होऊ शकतो किंवा कोंदट जागेतही होऊ शकतो, तेव्हा ‘इन डोअर’ मास्क वापरणे हे फायद्याचे ठरेल, हे लक्षात आले. कारण स्वतःला कोरोनापासून वाचवण्यास ड्रॉपलेट संसर्ग टाळू शकतो. ड्रॉपलेट इन्फेक्शन खोकणे, शिंकणे यातून होतो तर एअरबॉर्न हे इन्फेक्शन आपल्या बोलण्यातून उडणारे तुषार काही वेळ हवेत राहत असल्याने त्याला सूक्ष्म विषाणू चिकटून त्याचा प्रसार व संसर्ग दुसऱ्याला होऊ शकतो. ड्रॉपलेट हे पाच मायक्रॉन इतके सूक्ष्म असते तर एअर बॉर्न ५ मायक्रॉनपेक्षा कमी सूक्ष्म कणातून होते.
कोविड-१९ बिहेव्हीरील ट्रॅकरवर लंडनमधील इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थ इनोव्हेशन या संस्थेने केलेल्या संशोधनातून काही मुद्दे समोर आले. यु.के, यु.एस.ए. कॅनडा यांनी मास्कविषयी सुरुवातीच्या कोविड काळात फार आग्रह धरला नाही, मात्र नंतर हळूहळू मास्क अभियान जोर धरू लागले. स्पेन, इटली, कॅनडा यांनी मास्क वापरण्याविषयी सुरुवातीपासूनच आग्रह धरला. पण प्रशासनाच्या आवाहनाला जनतेने पुरेसा प्रतिसाद दिला नाही. भारतात काही ठिकाणी २००० रुपयेपर्यंत दंडआकारणी सुरू केली. मुंबईतील येथील काही भागात आणि ग्रामीण भागात मास्क वापरत नाहीत. त्यामुळेच केसेस वाढत आहेत. सिंगापूरमध्ये ९० टक्के, जपानमध्ये ८६ टक्के, फ्रान्समध्ये ७८ टक्के, यु.एस.ए. ७३ टक्के मास्क वापरतात. मात्र यु.के.मध्ये अजूनही मास्क वापरण्याचे प्रमाण कमी आहे. ऑस्ट्रेलियात फक्त २० टक्के लोक मास्क वापरतात.
या सर्वांवरून एकच लक्षात येते की, मास्क वापरणे, हात धुणे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून वाढणाऱ्या कोरोनाला पुन्हा एकदा ‘वेसण’ घालणे अत्यावश्यक आहे. या सर्व बाबी आपल्या हातातच आहेत. मुख्यमंत्रीही वारंवार त्रिसूत्रीचे आवाहन करीत आहेत. त्याचेे पालन करूया.
(लेखक राज्याचे माजी आरोग्यमंत्री आहेत.)