लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठा तरुणांना आरक्षण मिळायलाच हवे, आरक्षण न मिळाल्यास टोकाचा संघर्ष करू, अशी भूमिका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानातील आंदोलकांची फडणवीस यांनी मंगळवारी भेट घेतली. सरकार आरक्षणच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
उच्च न्यायालयात आतापर्यंत फक्त महाराष्ट्र आणि तामिळनाडूचे आरक्षण टिकले. आमच्या सरकारच्या काळात सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेले, तेव्हा आम्ही तयारी केली होती. न्यायालयानेही स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर, आताच्या सरकारच्या काळात सुनावणी झाली. या सरकारने न्यायालयाने विचारले नसतानाही ‘आ बैल मुझे मार’ म्हटल्याप्रमाणे कोणती भरती करणार नाही वगैरे भूमिका घेतली. अशी भूमिका मांडण्याची गरज नव्हती, न्यायालयाने तसे विचारलेही नव्हते. त्यापेक्षा आतापर्यंत ज्या नियुक्त्या दिल्या, त्या ठीक आहेत. मात्र, तुमच्या आदेशापर्यंत नव्या नियुक्त्या करणार नाही, असे न्यायालयाला सांगितले असते, तर बरे झाले असते, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारने जर मनात आणले, तर काही ना काही मार्ग काढता येऊ शकेल. दुर्दैवाने या सरकारमध्ये टोलवाटोलवीशिवाय काहीही होत नाही. मात्र, जोपर्यंत हा प्रश्न निकाली लागत नाही, तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करू. मराठा आरक्षण हा राजकीय प्रश्न नाही, हा तरुणांचा प्रश्न आहे. सरकारने मार्ग काढायला हवा, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सुप्रिया सुळे यांनीही घेतली आंदोलकांची भेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुंबईतील आझाद मैदान इथे आंदोलन करत असलेल्या सकल मराठा समाजाच्या युवकांची भूमिका जाणून घेण्यासाठी मंगळवारी खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजातील युवकांना आश्वासन नाही, तर स्थिरता हवी असल्याचे त्या म्हणाल्या. हे सर्व आपल्या महाराष्ट्राचे युवक आहेत, त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, हाच आमचा प्रयत्न असून, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मंत्री एकनाथ शिंदे, मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी आपण लवकरच चर्चा करणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.