एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 05:45 AM2024-06-16T05:45:36+5:302024-06-16T05:46:38+5:30
महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आम्ही निवडणूक लढणार आहोत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई
Mahavikas Aghadi: लोकसभेप्रमाणे आम्ही विधानसभेची निवडणूकही सर्व मित्रपक्षांना घेऊन लढणार आहोत. पुन्हा अधिक ताकदीने निवडणुकांना सामोरे जाणार असून, यासाठी विधानसभेचे जागावाटपही लवकरच पूर्ण होईल. राज्यात निश्चितपणे सत्ताबदल होईल, असा निर्धार महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांकडून शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेतून व्यक्त करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीनंतर - महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये कुरुबुरी सुरू असून, स्वबळाची भाषा केल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र उद्धवसेना, शरद पवार गट आणि काँग्रेसकडून यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांना पूर्णविराम देण्यात आला. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून आम्ही तीन पक्ष आणि इतर काही सामाजिक संघटना आणि छोटे पक्ष मिळून आम्ही निवडणूक लढणार आहोत.
महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थित (डावीकडून) जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण. यावेळी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात भूमिका स्पष्ट करण्यात आली.
भाजपचा अजिंक्यपणा फोल, जनतेने दाखविले
लोकसभा निवडणुकीत असे वातावरण होते की कोणी भाजपविरोधात लढू शकत नाही, पण त्यांचा हा अजिंक्यपणा किती फोल आहे हे जनतेने दाखवून दिले. तरीही भाजपला वास्तवाची जाणीव झाली नसेल तर विधानसभा निवडणुकीत त्यांना विस्तवाला सामोरे जावे लागेल. ही लढाई सुरू झाली आहे.
- उद्धव ठाकरे
मविआमध्ये मोठा भाऊ, छोटा भाऊ कोणी नसेल
महाविकास आघाडीत मोठा भाऊ, छोटा भाऊ असे कोणी
राहणार नाही. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची शक्यता असेल त्यांची ती जागा असेल. महाराष्ट्रात जवळपास सर्वच मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी प्रचार केला आहे. येत्या काळात जागावाटप निश्चित केले जाईल.
- पृथ्वीराज चव्हाण
...त्यामुळेच मोदींना धन्यवाद दिले पाहिजेत
लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यात १८ सभा घेतल्या. जेथे सभा, रोड शो घेतले, तेथील मविआच्या उमेदवारांचा विजय झाला. म्हणून विधानसभेला मोदींच्या जेवढ्या सभा होतील. तेवढी स्पष्ट बहुमताच्या दिशेने आमची वाटचाल होईल. त्यामुळे मोदींना धन्यवाद दिले पाहिजेत.
- शरद पवार
गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच नाही!
पक्ष सोडून गेले त्यांना परत घेणार का, यावर जे गेले त्यांना आम्ही परत घेणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले, तर गेलेल्या लोकांना परत घेण्याचा प्रश्नच येत नसल्याचे, शरद पवार यांनी स्पष्ट केले.
'एम' फॅक्टरवर प्रत्युत्तर
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार व ठाकरेंच्या उमेदवारांना 'एम' फॅक्टरचीच जास्त मते मिळाली या देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपासं- दर्भात विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले शिवसेनेला मराठी मते का कमी मिळतील? 'एम' फॅक्टरमध्ये मराठी येत नाही का? यावेळी आम्हाला लोकशाही वाचवण्यासाठी सर्वधर्मियांनी मतदान केले. त्यात मराठी तर आहेतच. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि इतर सर्वच आहेत.
'बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी?
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या प्रचाराचा फायदा ठाकरेंपेक्षा मित्रपक्षांनाच का झाला, असा सवाल करण्यात आला असता ते म्हणाले. माणिकवर्मा यांचे जुने गाणे आहे. शरद पवार यांना ते माहीत आहे. 'बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी?'. तुम्हाला हे गाणे माहीत नसेल. पण तरी पारिजातकाला आम्ही पाणी घालणे सोडणार नाही.