मुंबई - रस्त्यांचा प्रश्न तसा 12 महिने आणि 24 तासांची समस्या बनलेला आहे. मात्र, पावसाळा सुरू होताच, ही समस्या अधिक गंभीर होते. कारण, पहिल्या-दुसऱ्या पावसानंतर रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. त्यातून अनेकदा मोठ-मोठे अपघात होतात. या अपघातात कित्येंकानी आपला जीवही गमावला आहे. मात्र, रस्त्यांची समस्या ही सुटता सुटत नाही. त्यावरुनच, मराठमोळा अभिनेता हेमंत ढेमे याने उपहात्मक ट्विट करत रस्ते बांधणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर निशाणा साधला आहे.
रस्ते अपघाताचे एक कारण रस्त्यांवरील खड्डे हेही आहे. विशेषत: पावसाळ्यात खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडतात. गावापासून शहरांपर्यंत, मुंबईसारख्या महानगरांपर्यंत ही समस्या भेडसावते. याबाबत स्थानिक नागरिकांपासून ते सामाजिक कार्यकर्तेही आक्रमक होतात. विरोधकही रस्त्यांवर उतरताना दिसतात. मात्र, बारमाही चांगले रस्ते दिसणे हे स्वप्नच राहते. परवाच, मुंब्रा येथे एका 23 वर्षीय तरुणाचा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीवरुन पडल्याने अपघात झाला. या अपघातात तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
आपल्या सोशल मीडियातून नेहमीच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या अभिनेता हेमंत ढोमे याने मुंबईतील रस्त्यांबाबत उपहासात्मक ट्विट करुन रस्ते बांधणाऱ्या ठेकेदारांवर निशाणा साधला आहे. अतिशय प्रामाणिकपणे सांगतो… पंतप्रधान, मुख्यमंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक सग्गळे नंतर, खरे ‘कॅान्ट्रॅक्टर’! रस्ते बनवण्यात जी हातसफाई त्यांना जमते ना, कमाल! त्यांना कोणी बदलू शकत नाही. ते भारी आहेत! सगळ्यांना रस्त्याला लावतात. पुढचा जन्म रस्ते कॅान्ट्रॅक्टर चा मिळुदे बाबा !, असे ट्विट हेमंत ढोमे याने केले आहे.