मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दरवर्षी पावसाळ्यात मुंबईच्या समुद्रकिनारी ‘जेलीफिश’ (ब्ल्यू बॉटल) येतात. गिरगाव, जुहू, आक्सा या प्रमुख चौपाट्यांवर त्यांची दहशत असते. ऑगस्ट २०२१ साली गिरगाव चौपाटीवर जेलीफिश चावल्याच्या घटना घडल्या होत्या, तर गेल्यावर्षी २०-२३ जुलैच्या जुहू बीचवर जेलीफिश आले होते. यंदा पावसाळा उशिरा सुरू झाल्याने अजून तरी जेलीफिश मुंबईतील चौपाट्यांवर आले नाहीत. मात्र, कधीही दाखल होण्याची शक्यता आहे.
पर्यटकांनी समुद्रातील पाण्यात उतरू नये. जेलीफिशपासून स्वतःला वाचवावे. नागरिकांनी अनवाणी पाण्यात उतरू नये. समुद्रकिनारी फिरू नये, असे आवाहन जुहू चौपाटीचे जीवरक्षक मनोहर शेट्टी आणि सोहेल मुलानी यांनी पर्यटकांना केले आहे. गणपती विसर्जनापर्यंत जेलीफिशचा समुद्रात वावर असतो. दर शनिवार, रविवारी सुमारे २५ हजार पर्यटक जुहू चौपटीवर येतात. समुद्राचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, पर्यटकांनी आमच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्रात उतरू नये, असे आवाहन त्यांनी केले.
जेलीफिश चावल्यावर काय करावे?
जेली फिशचा मानवी संपर्क झाल्यावर ते करकचून चावतात. त्यामुळे होणाऱ्या वेदना असह्य असतात. अशा वेळी चावा घेतलेल्या ठिकाणी बर्फाने चोळून लिंबू लावावे. जखम जास्त असल्यास रुग्णालयात जावे, अशी माहिती निवृत्त जीवरक्षक रजनीकांत माशेलकर यांनी दिली.
कसे असतात जेलीफिश?
पावसाळ्यात समुद्राकडून जमिनीच्या दिशेने जोरदार वारे वाहतात. समुद्राला भरती आल्यावर वजनाने हलके असलेले जेलीफिश समुद्रकिनाऱ्याजवळ येतात. ते विषारी असून, साधारण हवा भरलेल्या निळ्या पिशवीसारखे असतात. त्यांच्या टेटॅकल्स पेशीमध्ये विषारी द्रव्य असून, चावल्यावर असह्य वेदना होतात. ‘पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ या नावाने त्यांची ओळख आहे.