मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वीच राम मंदिर लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. देशभराच्या कानाकोपऱ्यातून मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येला भाविक पोहोचले होते. तर, देशाच्या कानाकोपऱ्यात हा प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात साजरा झालं. भाजपाने नाही म्हटलं तरी राम मंदिर हा राजकीय मुद्दा बनवला आहे. त्यातूनच, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदारसंघातून नागरिकांना मोफत अयोध्या वारी घडवण्यात येणार असून रामललाचे दर्शन घेता येणार आहे. कोकणातूनही या अयोध्यावारीला सुरुवात झाली आहे. आमदार नितेश राणेंनी बसचे फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली.
भाजपने मुंबईकरांना रामलल्लाचं मोफत दर्शन घडविण्यास यापूर्वीच सुरुवात केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ५ फेब्रुवारी रोजीच पहिली विशेष रेल्वे अयोध्येकडे रवानाही झाली होती. त्यानंतर, आता कोकणातील रामभक्तांसाठीही चलो अयोध्या... ट्रीपचं आयोजन करण्यात आलं आहे.
कणकवली- देवगड- वैभववाडी विधानसभा मतदारसंघातून आज पहिल्या टप्प्यात रामभक्त अयोध्येला रवाना झाले आहेत. कणकवली ते पनवेल बससेवा व पुढे अयोध्येला जाण्यासाठी पनवेल ते अयोध्या विशेष रेल्वे गाडी सोडण्यात येणार आहे. राम भक्तांना अयोध्या वारी घडविण्यासाठी ही मोफत सेवा दिली असल्याचं आमदार नितेश राणे यांनी म्हटले. तसेच, आज सकाळी उपस्थित राहून रामभक्तांना अयोध्या दौऱ्याच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्याचंही त्यांनी ट्विटरवरुन म्हटलं आहे.
दरम्यान, देशाच्या राजकारणात राम जन्मभूमीचा मुद्दा नेहमीच सक्रीय राहिला आहे. आता, रामलला अयोध्येतील मंदिरात विराजमान झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून राम भक्तांना मोफत दर्शन घडवण्यासाठी मेगाप्लॅन तयार केला जात आहे. भाजपाबद्दल आणि मोदी सरकारबद्दल सकारात्मकता कायम ठेवण्यासाठी लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघातून नागरिकांना मोफत अयोध्यावारी घडवून आणली जात आहे. एका लोकसभा मतदारसंघातून ४० ते ५० हजार लोकं रामललाचं दर्शन घेतील, अशी भाजपाची योजना असल्याचे समजते. त्यासाठी, विशेष रेल्वे गाड्यांचंही नियोजन करण्यात येत आहे. दरम्यान, यापूर्वी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही आपल्या भाषणातून देशाच्या कानाकोपऱ्यातील रामभक्तांनी अयोध्येत येऊन रामललाचे दर्शन घेण्याचं आवाहन केलं होतं. विशेष म्हणजे हे दर्शन आमदार-खासदार मोफत करुन आणतील, असेही त्यांनी म्हटलं होतं. आता, ते मोफत अयोध्या दर्शन सुरू झाल्याचं दिसून येत आहे.