चलो गुजरात... मतदानासाठी महाराष्ट्रातील गुजरातींना मिळणार 'पगारी सुट्टी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2022 12:47 PM2022-11-22T12:47:59+5:302022-11-22T12:49:17+5:30
भाजपची स्थापना झाल्यानंतर लोकसभेचे पहिले कमळ उत्तर गुजरातमध्येच उमलले होते
मुंबई - देशाचं लक्ष लागलेल्या गुजरात विधानसभांच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बालेकिल्ल्यात ही निवडणूक होत असल्याने देशभरात सध्या गुजरात केंद्रस्थानी आहे. तर, भाजपने रेकॉर्डब्रेक विजयाचा संकल्प केला आहे. सतत २७ वर्षे गुजरातमध्ये भाजपचा दबदबा असून, अशामध्ये काँग्रेसने आपली सत्ता येण्यासाठी येथे संपूर्ण ताकद लावली आाहे. या निवडणुकीत आम आदमी पक्षही भाजपला आव्हान देण्याचा प्रयत्न करत आहे. या निवडणुकांसाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात राहणाऱ्या गुजराती बांधवांना मतदान करता येणार आहे.
भाजपची स्थापना झाल्यानंतर लोकसभेचे पहिले कमळ उत्तर गुजरातमध्येच उमलले होते. भाजपने १९८४ मध्ये पहिली निवडणूक लढवली होती. त्यावेळी देशात २ जागा जिंकण्यात त्यांना यश आले होते. यातील एक जागा उत्तर गुजरातमधील होती. त्यामुळेही गुजरातच्या निवडणुकांकडे देशाचे लक्ष लागले आहे. गुजरातमध्ये 1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान होत आहे. त्याममुळे, या दिवशी महाराष्ट्रातील ४ जिल्ह्यातील मतदारांना पगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने याबाबत परिपत्रक जारी केलं आहे. पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे गुजरातच्या सीमेला लागून आहेत. गुजरातमधील अनेक नागरिक महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात नोकरी, व्यवसायाच्या निमित्ताने आलेले आहेत. त्यांची नावं गुजरातमधील मतदार यादीतच आहेत. त्यामुळे त्यांना तिथे जाऊन मतदान करता यावं, यासाठी मतदानाच्या दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आहे. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्य सरकारने हा आदेश काढल्याचं म्हटलं जात आहे. गुजरातमध्ये मतदार असलेल्या, पण राज्यातील या चार जिल्ह्यात काम करणाऱ्यांना मतदानासाठी ही सु्ट्टी अथवा सवलत दिली जाणार आहे.
दोन टप्प्यात मतदान, ८ डिसेंबरला निकाल
गुजरातमध्ये यंदा 2 टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर 2022 या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होईल. याच दिवशी हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांचीही मतमोजणी होईल. निवडणुकीसाठी एकूण 51000 मतदान केंद्रं यासाठी उभारण्यात आली आहेत. त्यातील 34000 केंद्रं ग्रामीण भागात आहेत.