मुंबई : थायलंड येथे जाणाऱ्या भारतीय प्रवाशांना मे २०२४ पर्यंत व्हिसामधून सूट देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय विमान कंपन्यांनी थायलंड येथे जाणाऱ्या विमान फेऱ्यांच्या संख्येत वाढ केली आहे. तसेच, काही नव्या मार्गावरून थेट सेवादेखील सुरू करण्यात आली आहे.सध्याच्या घडीला मुंबई, दिल्ली, अहमदाबाद, भुवनेश्वर, बंगळुरू, कोलकाता यासह आणखी सात शहरांतून थायलंडमधील तीन शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध आहे. आणखी किमान ५ नव्या मार्गांवरून लवकरच थेट सेवा सुरू होणार आहे.
मुंबई, दिल्ली अशा प्रमुख शहरांतून फेऱ्यांच्या संख्येतदेखील वाढ करण्यात आली आहे. मुंबईतून सध्या ६० फेऱ्या करण्यात येत असून, दिल्लीमधून सर्वाधिक ७१ फेऱ्या प्रत्येक आठवड्याला होत आहेत. सर्व विमान कंपन्यांच्या मिळून आठवड्याला २६५ फेऱ्या थायलंडसाठी होत आहेत. याद्वारे एकूण ५३ हजार २६४ प्रवाशांची ने-आण करण्यात येते.