नवी मुंबई : ऐरोलीमधील पोस्ट कार्यालय वेळेवर सुरू होत नसल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. अर्धा ते एक तास कार्यालय उशिरा सुरू होत असल्यामुळे नागरिकांमधील संतापाची लाट आहे.ऐरोली सेक्टर १७ मध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी पोस्ट कार्यालस सुरू करण्यात आले आहे. सकाळी साडेआठ वाजता कार्यालयाची वेळ होती. परंतु आता कार्यालय सुरू होण्याची वेळ साडेनऊ करण्यात आली आहे. परंतु या ठिकाणीही कधीही वेळेवर कार्यालय सुरू होत नाही. सकाळीपासून नागरिक कार्यालयाबाहेर रांगा लावत आहेत. दोन दिवस सुट्टी असल्यामुळे सोमवारी सकाळी अनेक ज्येष्ठ नागरिक व इतरांनी कार्यालयाबाहेर वेळेवर हजेरी लावली. परंतु १० वाजेपर्यंत कार्यालय सुरूच झाले नाही. ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. या परिसरात राहणारे संतोष साठे पाटील यांची आई सोलापूरला राहते. तिला पैसे पाठविण्यासाठी ते सकाळी पोस्टात गेले होते. परंतु कर्मचारी वेळेत न आल्याने त्यांचीही गैरसोय झाली. उशिरा येण्याविषयी नागरिकांनी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी योग्य उत्तरे दिली नाहीत. कर्मचारी उशिरा येतात त्याला काय करायचे, असेही काही जणांनी सांगितले. नागरिकांची होणारी गैरसोय दूर व्हावी व कर्मचाऱ्यांना वेळेत कार्यालय सुरू करण्यासाठीच्या सूचना कराव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी)
ऐरोलीत पोस्टाचा लेटलतिफ कारभार
By admin | Published: March 03, 2015 12:27 AM