सलूनबाबत दिलासादायक निर्णय घेऊ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:07 AM2021-04-07T04:07:21+5:302021-04-07T04:07:21+5:30
उपमुख्यमंत्री, महापौरांचे आश्वासन; संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : सलूनला लॉकडाऊनमधून वगळण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व्यावसायिकांना दिलासा ...
उपमुख्यमंत्री, महापौरांचे आश्वासन; संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सलूनला लॉकडाऊनमधून वगळण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिल्याचे सलून व्यावसायिकांनी सांगितले.
मंगळवारी दुपारी दोन वाजता महापौरांनी सलून व्यावसायिकांसोबत बैठक घेतली. यावेळी व्यावसायिकांनी आपल्या समस्या मांडल्या. पहिल्या लॉकडाऊमध्ये झालेल्या नुकसानीतून थोडेफार सावरत असताना दुसरा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, आता दुकाने बंद ठेवल्यास व्यावसायिक नेस्तनाबूत होतील, आत्महत्यांचे प्रमाण वाढेल. त्यामुळे सलूनला लॉकडाऊनमधून वगळण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, असे आश्वासन महापौरांनी दिले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत सलून व्यावसायिकांची बैठक पार पडली. आपण सुरुवातीपासूनच सलूनला लॉकडाऊनमधून वगळण्याच्या भूमिकेत होतो, असे उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. सलूनला लॉकडाऊनमधून वगळण्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून व्यावसायिकांना दिलासा देणारा निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे महाराष्ट्र राज्य सलून आणि ब्युटीपार्लर असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांनी सांगितले.