चला, सगळ्यांनी मिळून करू या मुंबईला हिरवीगार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 08:33 AM2023-04-12T08:33:57+5:302023-04-12T08:34:08+5:30
मुंबईत शास्त्रोक्त आणि सूक्ष्म पद्धतीने शहर हरितीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे
मुंबई :
मुंबईत शास्त्रोक्त आणि सूक्ष्म पद्धतीने शहर हरितीकरण करण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे असलेली पुस्तिका येत्या सहा महिन्यांत पालिकेकडून प्रकाशित करण्यात येणार आहे. मुंबईला हरित शहर बनविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असून, त्यासाठीच्या आवश्यक माहितीपासून ते मार्गदर्शन, साहित्य, झाडांच्या प्रजातीपर्यंत सर्व मार्गदर्शन नागरिकांना उपलब्ध होणे हा या मार्गदर्शन पुस्तकाचा मुख्य उद्देश असणार असल्याची माहिती महापालिका उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.
मुंबईत प्रत्येक घरापासून ते प्रत्येक मोकळ्या सार्वजनिक जागेपर्यंत सर्वत्र हरित आच्छादन व हरित क्षेत्र वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग लाभावा, त्या दृष्टीने विचारविनिमय करण्यासाठी उद्यान विभाग, संबंधित भागधारक आणि देशातील ७५ विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत कार्यशाळा झाली. या बैठकीदरम्यान सर्व संबंधितांची मते, अभिप्राय, सूचना, विचार संकलित करून, त्याला अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे. वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट, इंडिया यांच्यासह विविध प्राधिकरणांचे अधिकारी, हरिततज्ज्ञ, वास्तुतज्ज्ञ, नागरिकांचा सहभाग आहे.
मुंबईत हरितीकरण शक्य असलेल्या मोकळ्या व सार्वजनिक लहानसहान जागा शोधणे, महापालिकेच्या सर्व २४ विभाग कार्यालयांच्या स्तरावर नागरिकांना स्थानिक प्रजातींची रोपे उपलब्ध करून देण्यासाठी मदत अशा बाबी तत्काळ सुरू करण्यात येणार आहेत.
- जितेंद्र परदेशी, अधीक्षक, महापालिका उद्यान
तीन स्तरांवर हरितीकरण वाढविण्यावर भर
- व्यक्तिगत स्तर- घर, खिडक्या, बाल्कनी
- मध्यम स्तर- इमारतींच्या मोकळ्या जागा, सामुदायिक वापराच्या जागा
- मोठे स्तर - मोकळे सार्वजनिक भूखंड, रस्ते, मैदाने, इत्यादी.
माहिती पुस्तिका ठरेल मार्गदर्शक
मुंबईतील हरितीकरणासाठी उभ्या मांडणीची उद्याने (व्हर्टिकल गार्डन ॲण्ड ग्रीनिंग), गच्चीवरील उद्याने (टेरेस गार्डनिंग) आणि इमारतीच्या भूखंडावर योग्य तेथे हरितीकरण, फ्लायओव्हरखालील मोकळ्या जागेत गार्डनिंग यांसारखे विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न पालिकेच्या उद्यान विभागाकडून सुरू आहे. मात्र अनेकदा जागा उपलब्ध असूनही गार्डनिंग संकल्पना कशी राबवावी, कोणत्या झाडांच्या, रोपट्यांच्या प्रजाती राबवाव्यात, पैशांची कमतरता असणे, सीएसआर निधी कसा उपलब्ध करून घ्यायचा याची माहिती नसणे अशा अनेक अडचणी नागरिकांना येतात. या सर्व अडचणींवर उपाय म्हणून ही पुस्तिका काम करील, अशी अपेक्षा परदेशी यांनी व्यक्त केली. ही पुस्तिका वॉर्डनिहाय अधिकाऱ्यांकडे उपलब्ध तर असेलच; शिवाय नागरिकांसाठी पालिकेचे अधिकृत संकेतस्थळावरही असेल, असे त्यांनी स्पष्ट केले.