‘टीवायबीकॉम’च्या परीक्षेला लेटमार्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 05:34 AM2018-10-26T05:34:29+5:302018-10-26T05:34:38+5:30
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षाच्या (टीवायबीकॉम) परीक्षेला गुरुवारपासून सुरुवात झाली असताना पहिल्याच दिवशी विद्यापीठाचा सर्व्हर डाऊन झाला. त्यामुळे अनेक महाविद्यालयांत प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचली आणि पेपरला अर्धा तासाचा ‘लेटमार्क’ लागला. प्रशासनाच्या या गोंधळामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
विद्यापीठाकडून १२ ते १२. ३० च्या दरम्यान प्रश्नपत्रिका कॉलेजमध्ये पोहोचल्यावर, विद्यार्थी संख्येप्रमाणे त्याच्या प्रती काढण्यात आल्या. त्यामुळे परीक्षा नियमित वेळेपेक्षा अर्धा तास उशिरा सुरू झाली. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक अर्जुन घाटुळे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
>वादातीत उत्तरपत्रिका कायम
मुंबई विद्यापीठाने आॅनलाइन मूल्यांकनातील त्रुटी दूर करण्यासाठी यंदापासून नव्या उत्तरपत्रिकांची छपाई केली. या उत्तरपत्रिकांमध्ये थेट विद्यार्थ्यांच्या नावाचा उल्लेख असलेला रकाना नमूद केला आहे. नावाच्या छपाईमुळे नवा वाद सुरू झाला असून, यामुळे परीक्षा प्रक्रियेतील गैरप्रकारांना नवा मार्ग मिळेल, अशी टीका होत आहे. मात्र विद्यापीठ प्रशासनाकडून त्या उत्तरपत्रिकांची छपाई झाली असून, त्या वापरल्या न गेल्यास कोटींचे नुकसान होईल. त्यामुळे सध्याच्या परीक्षेसाठी ती उत्तरपत्रिका कायम ठेवल्याची माहिती सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली. दरम्यान, पुढच्या परीक्षेसाठी मात्र उत्तरपत्रिकेत आवश्यक ते बदल करण्यात येणार असल्याचे आश्वासन विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.