आपला बहिरेपणा आपणच मोजू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:06 AM2021-03-10T04:06:33+5:302021-03-10T04:06:33+5:30

तज्ज्ञांचे मत; जागतिक आरोग्य संघटनेच्या मोहिमेत केंद्रासह राज्य सरकारने सहभागी होण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई शहर ...

Let's measure our deafness! | आपला बहिरेपणा आपणच मोजू या!

आपला बहिरेपणा आपणच मोजू या!

Next

तज्ज्ञांचे मत; जागतिक आरोग्य संघटनेच्या मोहिमेत केंद्रासह राज्य सरकारने सहभागी होण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसागणिक वाढत असून बहिरेपणाचे प्रमाणही वाढत आहे. ते माेजण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने एक ॲप तयार केले असून, या माध्यमातून आपण आपला बहिरेपणा मोजण्याची गरज आहे आणि तो आपण मोजलाच पाहिजे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेण्याची गरज असून त्यासाठीची मोहीम अथवा चळवळ उभी करत सर्वसामान्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी काम केले पाहिजे, असे मत ध्वनिप्रदूषण क्षेत्रात कार्यरत तज्ज्ञांनी मांडले.

ध्वनिप्रदूषणाबाबत जागतिक स्तरावर काम करणाऱ्या आवाज फाउंडेशनच्या सुमेरा अब्दुल अली यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की, ध्वनिप्रदूषणाची समस्या दिवसागणिक वाढत असून जागतिक स्तरावरील सर्वच शहरांमध्ये ही अडचण कायम आहे. विशेषतः दक्षिण आशियात भारत आणि उर्वरित देशांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या समस्येने कहर केला आहे. वाहनांच्या माध्यमातून होणारे किंवा इतर अनेक कारणांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण असो; यामुळे नागरिकांना बहिरेपणाला सामोरे जावे लागत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने बहिरेपणाच्या मोजमापासाठी ॲप तयार केले आहे. ते स्मार्टफोन वापरणारी व्यक्ती आपल्या मोबाइलमध्ये इन्स्टाॅल करू शकते आणि आपला बहिरेपणा मोजू शकते. ताे मोजल्यावर आपण त्यावर उपाय करू शकतो. याव्यतिरिक्त या ॲपमुळे आपण जेथे राहताे त्या परिसरातील ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठीही आपण काम करू शकतो. मात्र ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्रित काम केले पाहिजे.

मुंबईसारख्या महानगरांमध्ये स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण कमी असू शकेल. शिवाय प्रत्येकाला हे ॲप इन्स्टॉल करून आपला बहिरेपणा मोजणे शक्य होणार नाही. अशावेळी सरकारने पुढे येऊन याकामी अत्यंत वेगाने काम केले पाहिजे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना मी यासंदर्भात पत्र लिहिले आहे. सरकारला केवळ याकामी पुढाकार घेऊन मोहीम उभी करण्याची गरज आहे. असे केले तरच ध्वनिप्रदूषणाची समस्या कमी करण्यासाठी आतापासूनच काम करणे शक्य होईल आणि वेळीच उपाय योजले जातील. यामुळे आपल्या पुढच्या पिढ्यांना याचा त्रास होणार नाही, असे सुमेरा अब्दुल अली यांनी सांगितले.

................................

Web Title: Let's measure our deafness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.