सहलींचे नियोजन करू, पण परताव्याची हमी द्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:33+5:302021-07-21T04:06:33+5:30
८१ टक्के पर्यटकांचे मत; कोरोना निर्बंधांमुळे प्लॅन रद्द होण्याची भीती अधिक लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाकाळात घरात बसून ...
८१ टक्के पर्यटकांचे मत; कोरोना निर्बंधांमुळे प्लॅन रद्द होण्याची भीती अधिक
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाकाळात घरात बसून कंटाळलेले पर्यटक निसर्गाविष्काराचा मनसोक्त आस्वाद घेण्यास उत्सुक आहेत. मात्र, अनिश्चित निर्बंधांमुळे बेत रद्द करावा लागण्याची भीती त्यांना सतावत आहे. अशा काळात प्लॅन रद्द झाल्यास परताव्याची हमी मिळणार असेल तर बिनदिक्कत सहलींचे नियोजन करू, असे मत ८१ टक्के पर्यटकांनी व्यक्त केले.
थॉमस कुक आणि ‘एसओटीसी’ या आस्थापनांनी कोरोनाकाळात पर्यटकांचा कल जाणून घेण्यासाठी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. यात देशभरातील ४ हजारांहून अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. प्रथम, द्वितीय आणि तृतीय श्रेणीनिहाय शहरांतील पर्यटकांच्या प्राधान्यक्रमाचा अभ्यास या अहवालातून मांडण्यात आला आहे. सहभागार्थींपैकी ६९ टक्के नागरिकांनी चालू वर्षात पर्यटनासाठी घराबाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली, तर ३१ टक्के पर्यटकांनी २०२२ मध्ये सहल नियोजनासंदर्भात विचार करणार असल्याचे सांगितले.
अहवालानुसार, ५४ टक्के पर्यटक देशांतर्गत पर्यटनाचा आनंद घेऊ इच्छितात, तर ४६ टक्के नागरिकांना आंतरराष्ट्रीय ठिकाणांचा वेध घेण्याची प्रबळ इच्छा आहे. ७० टक्के पर्यटकांना पर्यटन कंपन्यांकडून आरोग्य सुरक्षेची हमी हवी आहे, तर १९ टक्के नागरिकांना सहलीच्या काळात संसर्ग होण्याची धास्ती वाटते. ६६ टक्के सहभागार्थी मात्र आरोग्य आणि वैयक्तिक सुरक्षेबाबत अतिरिक्त खर्च करण्यास तयार आहेत. सातत्यपूर्ण निर्जंतुकीकरण, लसीकरण पूर्ण झालेले कर्मचारी दिमतीला असल्यास तातडीने नियोजन करण्याची भावना त्यांनी व्यक्त केली. सहल रद्द झाल्यास परतावा देण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची मागणी ८१ टक्के पर्यटकांनी केली.
कोरोनाकाळातही माणसांच्या सहवासात सफरीचा आनंद घेण्याची इच्छा ७७ टक्के जणांनी व्यक्त केली. तर ३३ टक्के नागरिकांना स्पर्शविरहित नियोजन करायचे आहे. कोणासोबत सहलीस जायला आवडेल, या प्रश्नावर ६२ टक्के जणांनी कुटुंबीयांसोबत जाण्यास पसंती दर्शविली. जोडीदारासोबत जाण्यास २० टक्के, तर लसीकरण पूर्ण झालेल्या चमूसोबत पर्यटन करण्याची इच्छा १८ टक्के पर्यटकांनी व्यक्त केली.
..........
या ठिकाणांना सर्वाधिक पसंती
देशांतर्गत – लेह-लडाख, हिमाचल, अंदमान, गोवा, केरळ.
आंतरराष्ट्रीय – दुबई, अबुधाबी, मालदीव, मॉरिशस, थायलंड, युरोप.
.........
किती दिवस भ्रमंती करायला आवडेल?
३५ टक्के नागरिकांना ३ ते ५ दिवस, ५२ टक्के जणांना ६ ते १२ दिवस, तर १३ टक्के पर्यटकांना १२ दिवसांहून अधिक काळ पर्यटनाचा आनंद घ्यायला आवडेल, असे त्यांनी नमूद केले आहे.