Join us

कोरोनाला हरविण्यासाठी उभारू ‘सकारात्मक’तेची गुढी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:05 AM

दरवर्षी आनंद आणि उत्साह घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणावर यावर्षीही कोरोना विषाणूचे सावट आहे. दरवर्षी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी असते. मात्र ...

दरवर्षी आनंद आणि उत्साह घेऊन येणाऱ्या गुढीपाडव्याच्या सणावर यावर्षीही कोरोना विषाणूचे सावट आहे. दरवर्षी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी असते. मात्र कोरोनाच्या संकटामुळे मागील वर्षीप्रमाणे यावर्षी सगळीकडे सामसूम आहे, अर्थात ती आवश्यकच आहे. तरच आपल्याला या विषाणूची साखळी तोडता येईल. ‘दिस जातील, दिस येतील; भोग सरल, सुख येईल’ या बोलाप्रमाणे कोरोनाचं हे मळभ नक्की दूर होईल. परंतु तोपर्यंत सर्वात महत्त्वाचं घाबरून जाऊ नका. आजपर्यंत मानव जातीवर अनेक संकटे आली आणि गेली. पण माणसाने प्रत्येक संकटावर मात केली, तशीच या संकटावरही मात करण्यात आपल्याला यश मिळेल.

--------------------

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर हिंदू नववर्षाची सुरुवात होते. अनेक जण नवीन वर्षाचे नवीन संकल्प करतात. यावर्षी कोणीही सणवार साजरे करण्याच्या मनस्थितीत नाही. उलट सध्याच्या परिस्थितीत भविष्याची चिंता सतावत आहे. पण, परिस्थितीला घाबरून न जाता धीराने तोंड द्यायला हवे. गुढी उभारणीचा हा सण सर्वांना आनंदाचा, सुखसमृद्धीचा जावो. सर्वांसाठी ‘मंगलमय’ विचार मनात आणू या. कारण सध्याच्या आधुनिक शास्त्रानुसार हे सिद्ध झालंय की जेव्हा आपण नकारात्मक विचार मनात आणतो तेव्हा त्याचा सर्वांत प्रथम परिणाम होतो तो स्वतःवरच. त्यामुळे सतत सकारात्मक विचार असावेत व वागणेही त्याच दिशेने असावे.

असं म्हणतात की अतिशय दुःखी असणाऱ्या, सतत दुःखाला कवटाळत बसणाऱ्या व्यक्तीच्या दारावर आलेलं सुखही, ही व्यक्ती आपल्याकडे पाहात नाही म्हणून नाराज होऊन निघून जातं. हाच विचार यांच्या मनात रुजवणं आज काळाची गरज आहे. सकारात्मक विचारांची गुढी या व्यक्तींसाठीही उभारायची. तरच विचार बदलतील व अशी व्यक्ती बदलून जाईल.

छोट्या-छोट्या गोष्टींमुळे नैराश्यात जाणारी आजची तरुण पिढी. खरे तर या सगळ्याच तरुणांच्या हाती एक एक सकारात्मकतेची गुढी द्यायला हवी. पालक-शिक्षक किंवा वयाने यांच्यापेक्षा थोडी मोठी असणारी व्यक्ती तरुण पिढीचं योग्य मार्गदर्शन करू शकते. कुणीही जरा काही बोललं, मनासारखी गोष्ट घडली नाही तर अगदी आत्महत्या करण्यापर्यंत मजल मारणाऱ्या या पिढीला गरज आहे ती मायेच्या दोन शब्दांची, आपलेपणाची. ही गोष्ट जमवून आणूया का यंदाच्या गुढी उभारणीला?

चौकट

नकारात्मक विचारांचं बीजारोपण थांबवा

काही जण फेसबुक, व्हॉट्‌सॲपवर सतत नकारात्मक पोस्ट पाठवत असतात. अपघात, आत्महत्या, मारहाण असे भयानक फोटो पाठवण्यात त्यांना काय आनंद मिळतो माहिती नाही. काय साध्य होतं याने? फक्त नकारात्मक विचार पसरतात. हाच मुद्दा अशा व्यक्तींना सांगावा लागेल. अशा भयानक पोस्ट्‌स फॉरवर्ड करून सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या मनात नकारात्मक विचारांचं बीजारोपण करता. जमेल ही सकारात्मक गुढी उभारायला?

आवडत्या गोष्टींसाठी वेळ द्या

दररोज घड्याळ्याच्या गजराच्या आवाजाने नाइलाजाने उठून एका क्षणाचीही उसंत न घेता आपण फक्त धावत असतो. पण आता मात्र ‘लॉकडाऊन’च्या निमित्ताने का होईना, तुम्हाला रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात राहून गेलेल्या अनेक आवडत्या गोष्टींसाठी वेळ मिळेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबासोबत वेळ घालवा. मुलांसोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत खेळ खेळा, त्यांना विविध गोष्टी शिकवा. त्यांना अनेक बोधप्रद गोष्टी सांगा.

- स्वप्निल कुलकर्णी