Join us

महात्मा गांधींजींचे विचार पुन्हा अंमलात आणू या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2019 3:09 AM

महात्मा गांधी. त्यांनी मांडलेले सत्य, अहिंसा हे विचार महत्त्वाचे मानले जातात.

महात्मा गांधी. त्यांनी मांडलेले सत्य, अहिंसा हे विचार महत्त्वाचे मानले जातात. काळ बदलला, तसे गांधींजीचे हे विचार आजची तरुणाई आचरणात आणते का? त्यांना गांधीजी कसे भावतात? २ आॅक्टोबरला असणाऱ्या महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीच्या निमित्ताने यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...आज गांधीवाद म्हटले की, समोर येतात ते सत्य, अहिंसा, अस्तेय, ब्रह्मचर्य यांसारखे व्रतविचार. गांधीजींच्या या अहिंसा आणि सत्य या विचारांशी मी फारसा सहमत नाही, पण त्यांचे शिक्षणविषयक विचार मला प्रभावित करतात. ते आजच्या स्थितीत जसेच्या तसे अंमलात आणावेत, इतके महत्त्वाचे आहेत. सक्तीचे व मोफत शिक्षण ही त्यांचीच संकल्पना. मातृभाषेतून शिक्षण द्यावे, यावरच त्यांचा भर होता. पुस्तकाच्या चौकटीतले शिक्षण त्यांना मान्य नव्हते. कृतीतून शिकावे, असे ते म्हणत. त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. विविध हस्तोद्योग, कला, व्यवसाय ते मुलांना स्वत: शिकवत. बापूंनी ३ एच ही शैक्षणिक संकल्पना मांडली. या तिन्ही बाबी एकत्र येऊन जो विकास होईल, तोच व्यक्तीचा आणि राष्ट्राचा विकास, असे ते म्हणत. त्यांची ही शिकवण आज आपण कुठेतरी विसरलो आहोत. त्यांचे शिक्षणविषयक विचार आजच्याच काळाशी सुसंगत आहेत असे नव्हे, तर कितीतरी पुढचा विचार करणारे आहेत.- विनायक तांबिटकर‘सच्चाई मेरा कर्म है। यहीं मेरे हिंदुस्थान की शान है’ खरंच जर या ओळीचा सर्वांनी विचार केला, तर गांधीजींनी जी शिकवण दिली, तिचा फायदा झाला, असे म्हणता येईल. सध्याच्या काळात आपले अधिकार आपण विसरत चाललो आहोत. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे असो वा स्वातंत्र्य मिळवून दिले आहे, त्यांची विटंबना करतो. त्यांच्या शिकवणी विसरलो आहोत. सध्याची परिस्थिती पाहता गांधीजींच्या त्या तत्त्वाची गरज आहे. आपण कधी खरं बोलत नाही. मग तो मित्रपरिवार असो वा कुटुंब. सत्यापासून आपण दूर जात आहोत. कोणत्याही गोष्टीवरून आपण चिडचिड करत असतो, हे टाळणे आवश्यक आहे.- मानसी सौंदळकर, पाठक महाविद्यालय.महात्मा गांधीजींची सत्य, सत्याग्रह, अहिंसा ही तत्त्वे विसाव्या शतकातही योग्य होती आणि एकविसाव्या शतकातही लागू पडतात. भ्रष्टाचार, असत्य, अन्याय हे नेहमीच होत आहेत. त्यामुळे या अन्यायी लोकांना पैसा, मान, समाजात प्रतिष्ठा मिळते, परंतु ती काही काळच टिकते. एकविसाव्या शतकात भ्रष्टाचारी, अन्यायी माणसांमुळे शेकडो सामन्य माणसे पीडित बनत आहेत. अशा वेळी हिंसा करून न्याय मिळविणे हे पूर्णपणे अयोग्य ठरते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर माणसे सुशिक्षित बनत आहेत, अशा सर्वांनी एकत्र येऊन विचारांच्या, माहितीच्या जोरावर अहिंसा पद्धतीने अन्यायाविरुद्ध लढणे आजही तितकेच गरजेचे आहे. अनेक सुशिक्षित लोकांनी एकत्र येऊन अहिंसा पद्धतीने न्याय मिळविणे हे कधीही योग्यच ठरेल. पुढे जाऊन इतकंच म्हणू इच्छितो की, अन्याय, भ्रष्टाचाराविरुद्ध सत्याग्रह, अहिंसा हे करण्याची गरज भासणारच नाही. जर देशातील प्रत्येक माणूस त्याची जबाबदारी स्वत:हून प्रामाणिकपणे निभावेल, सत्य वागेल व हेच पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवेल, तरच देशहित शक्य आहे.-ऋषिकेश तरळ, पोतदार महाविद्यालयगांधीजींचे पहिले तत्त्व म्हणजे अहिंसा. गांधीजींना स्वातंत्र्य नक्कीच हवे होते, पण ते अहिंसेच्या मार्गाने. कोणालाही हानी किंवा दुखापत न पोहोचविता ते स्वातंत्र्यासाठी लढले. शेवटपर्यंतकितीतरी त्रास होऊनही त्यांनी त्यांचे अहिंसेचे तत्त्व सोडले नाही. समोर कितीतरी क्रूर, हिंसक घटना घडत असतानादेखील त्यांनी स्वत: शांत राहून शक्तीच्या नाही, तर युक्तीच्या मार्गाने त्याला उत्तर देणे योग्य समजले. सध्याच्या जगात क्रूरता व हिंसकता या गोष्टी सर्व ठिकाणी पाहायला मिळतात. कधी क्रोधातून, कधी वादातून तर कधी गुन्ह्यातून हिंसकता तिचे रूप दाखवत असते. दहशतवाद्यांचा होणारा जीवघेणा हल्ला व त्यात मारले जाणारे निष्पाप बळी हे हिंसकतेचे व विध्वंसतेचे लक्षण आहे. परंतु त्याला अहिंसतेच्या मार्गाने उत्तर देणे. हे तितकेच अवघड आहे आणि जर अहिंसतेचे तत्त्व आजच्या नव्या पिढीत रुजवायचे असेल, तर त्याकरिता द्वेष, मत्सर, राग अशा विकारी भावनांचा नाश करावा लागेल व आदर, सहकार्य, धैर्य अशा गुणांचाविकास करावा लागेल.- वैभवी वाळंज, रुईया महाविद्यालय.महात्मा गांधींनी जगाला राजकीय तत्त्वज्ञान दिले नाही, तर जगण्याचा मार्ग दाखविला. गांधीजी म्हटलं की सत्य, अहिंसा हेच विचार आठवतात. गांधींची ओळख शाळेत असताना होते. तेव्हा त्यांची तत्त्वे समजण्याचे वयदेखील नसते, पण आजच्या पिढीत नेमके गांधीजींच्या विचारांच्या उलट वागविले जाते. प्रत्येक जग गोष्ट चांगली की वाईट हे न बघता आपला फायदा असेल तेथे हजर असतात. अशा लालसेपोटी कित्येक वर्षांत भारतीय जनता चांगल्या विचारांपासून चांगल्या गोष्टींपासून दुरावली आहे. आजच्या काळात लोकशाही, समाजवाद हे शब्द पुस्तकांतच शोभून दिसतात.- वंशिता पवार, डहाणूकर कॉलेज.कोणीतरी म्हणाले होते वाईट बघू नका, ऐकू नका आणि बोलू ही नका, परंतु आता तर या गोष्टींच्या उलटच परिस्थिती दिसून येते. कोणी सत्याची साथ दिली, तर त्यालाच दोषी ठरविले जाते अथवा त्या व्यक्तीवर दबाव आणला जातो. इथे कोणी सत्य बोलले, तर जीव जाईल असाच आव आणतात. आपल्या राष्ट्रपित्याने दिलेली शिकवण काळाच्या ओघात लुप्त झाली आहे, पण ते म्हणतात ना, एक खोटं बोलल्यावर दहा खोटे बोलावी लागतात. त्यामुळे सत्य हे कितीही कठोर असले तरी चालेल, पण नेहमी सत्य बोला.- दीपाली पिलके,भवन्स महाविद्यालय.लहानपणी आम्हाला हिंदीमध्ये महात्मा गांधींचा धडा होता. त्यामध्ये महात्मा गांधी हे कसे स्वावलंबी होते, यावर लिहिले होते. तसे तर महात्मा गांधींच्या बºयाच गोष्टी आहे. बापंूच्या स्वावलंबीपणाच्या व्यक्तिमत्त्वामुळे लहानपणापासून बापूंविषयी माझ्या मनात आदर निर्माण झाला. महात्मा गांधी मुस्लीम व इतर सर्व धर्मांतील लोकांना सोबत घेऊन चालत होते, ही त्यांची समाजाप्रती प्राथमिकता होती. महात्मा गांधींचे सत्य, सत्याग्रह आणि अहिंसा ही तत्त्वे फक्त आज नसून तर पुढे हजारो काळासाठी गरजेचे आहेत. बापू हे अहिंसावादी होते आणि त्यांची ती विचारधारा मला खूप प्रभावी बनविते. माझे युवक म्हणून सर्व युवकांना सांगणे आहे की, जगासोबत चला, पण अहिंसेच्या मार्गाने गांधींसारखे.- शाकिर शेख, ओरिएंटल महाविद्यालय.गांधीजी म्हणाले होते हिंसा करू नये, अहिंसेच्या मार्गाने लढा द्यावा. माझ्या मते, आताचे जग हे खूप विद्रूप झाले आहे. इथे प्रत्येक जण रोजच्या प्रवासात कळत नकळत हिंसा करतो, खोटं बोलतो, भोळ्या लोकांना फसवतो. राजकारणी खोटी आश्वासने देऊन लोकांना खोटी स्वप्नं दाखवितात, स्त्रियांना स्वतंत्रपणे जगता येत नाही, कारण त्यांना कायम वाईट नजरेने बघितले जाते. माणूस खूप स्वार्थी झाला आहे, स्वत:च चांगलं करण्यासाठी दुसऱ्यांचे वाईट चिंतन करतो. इतकेच नव्हे, तर भारतीय नोटेवरील राष्ट्रपिता यांची फक्त व्यवहारापुरतीच किंमत केली जाते, पण त्या महान व्यक्तीचे विचार आचरणात आणले जात नाही.- अश्विनी रहाटे, आंबेडकर महाविद्यालय.गांधींची विचारसरणी खूपच व्यापक होती. आजच्या वातावरणाला बघता, महात्मा गांधींनी केलेल्या सत्याग्रहाची, त्यांच्या तत्त्वाची उणीव भासते. आपण ज्या समाजात वावरत आहोत, तो कुठल्या ना कुठल्या कारणाने मागासलेला आहे. त्याला न्यायाची गरज आहे, पण तो न्याय समतावादी असायला हवा, त्याचा मार्ग हा शांतिमय असावा. जो गांधीजीच्या अहिंसावादी तत्त्वात दिसायचा. युवक म्हणून मला असे वाटत की, आपण सर्वांनी गांधींना वाचायला हवे, बघायला हवे आणि काही प्रमाणात आत्मसात करायला हवे, जेणेकरून युवांमध्ये अहिंसेचे प्रमाण कमी होईल व आपले युवक, युवती हे प्रेरणादायी जीवन जगतील.- रूक्सार खान, एस एम टी. एम एम पी शहा महाविद्यालय.आपण आपला स्वभाव कसा आणि कुठे कशा प्रकारे वापरतो, हे आपल्यावर असते. त्यामुळे गांधीजींनी दिलेली शिकवण ही आजची तरुण पिढी विसरत चालली आहे. तरीदेखील आपल्या हक्काची पूर्तता होण्यासाठी आजही महात्मा गांधीजींची शिकवण आठवते. त्यामुळे सत्य, अहिंसा सत्याग्रह ही अमूल्य तत्त्वे प्रत्येकांनी जोपासली पाहिजे. त्यामुळे ऐकमेकांमधील दोष कमी होऊन देशाला फायदा होईल. सरकारी यंत्रणा ही त्यांचा कामाचा, त्यांच्या शक्तीचा दूर उपयोग करतात. सध्याच्या घडीला सत्याग्रह हा आपल्या दैनंदिन जीवनात महत्त्वाचा आहे. त्यामुळे गांधीजींच्या शिकवणीचा उपयोग हा आपल्या भविष्यातील चांगला कामाला उपयोगी येणार.- कल्याणी सौंदळकर, प्रगती महाविद्यालय.

टॅग्स :महात्मा गांधी