Join us

धोका ओळखून तयार राहूया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:06 AM

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहानग्यांना असणारा संसर्गाचा धोका ओळखून इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनीही राज्य शासनाला कोविडविरोधात लढण्यासाठी ...

मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहानग्यांना असणारा संसर्गाचा धोका ओळखून इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स यांनीही राज्य शासनाला कोविडविरोधात लढण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेत लहानग्यांना संसर्गाचा धोका असल्याचे सांगितल्यानंतर राज्यातील बालरोगतज्ज्ञांना याविषयी सूचना दिल्याची माहिती बालरोगतज्ज्ञांच्या संघटनेने दिली आहे.

नुकत्याच मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत मांडण्यात आलेल्या निरीक्षणाअंती बालरोगतज्ज्ञांनी सांगितले की, आतापर्यंत लहान मुलांना झालेल्या संसर्गात ९० टक्के रुग्णांमध्ये संसर्गाची तीव्रता सौम्य व लक्षणविरहीत राहिली आहे. हा आजार गंभीर अवस्थेत जाण्याची शक्यता कमी असते. बऱ्याचदा या रुग्णांच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम झालेला दिसून आला आहे, परंतु गुंतागुंतीच्या प्रकरणांचे प्रमाण कमी आहे.

याविषयी, इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सचे अध्यक्ष डॉ. पियुष गुप्ता यांनी सांगितले, तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर संसर्ग नियंत्रणाच्या दृष्टीने सर्व सदस्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, वेळोवेळी टास्क फोर्समधील तज्ज्ञांशी चर्चा करुन दिशा ठरविण्यात येत आहे. मात्र, या काळात लहानग्यांच्या शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी लहानग्यांशी संवाद साधणे, त्यांचा अप्रत्यक्ष ताण-नैराश्य पालकांनी समजून घेऊन त्यावर मार्ग काढला पाहिजे. तसेच वेळ पडल्यास वैद्यकीय सल्ला, औषधोपचार घेणेही महत्त्वाचे आहे.

खाटांचे व्यवस्थापन करणे गरजेचे

इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या माहितीनुसार, कोरोनाच्या मागील दोन लाटांमध्ये कोविडचा संसर्ग झालेल्या लहानग्यांपैकी अतिदक्षता विभागाची गरज भासणाऱ्या रुग्णांचे प्रमाण अत्यंत कमी होते. मात्र, कोरोनाच्या विषाणूमध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे तिसऱ्या लाटेत यावर बारकाईने लक्ष दिले पाहिजे. तसेच मागील लाटांमधील संसर्ग बाधितांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती कमी झालेल्या रुग्णांना २ ते ६ आठवडे उपचार घ्यावे लागले. परंतु, आता तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून लहान रुग्णांसाठी खाटांचे व्यवस्थापन आणि अतिदक्षता विभागातील खाटांची उपलब्धता निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच क्लिनिकल ट्रायलअंती या लहानग्यांना लसीकरणातही सहभागी करुन घेतले पाहिजे.

- डॉ. बकुल पारेख, माजी अध्यक्ष, इंडियन ॲकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्स