मेट्रो २ अ आणि ७ लागली धावू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:05 AM2021-06-20T04:05:55+5:302021-06-20T04:05:55+5:30
२० कि.मी. अंतरासाठीच्या चाचण्या सुरू लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मेट्रो २ अ (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ...
२० कि.मी. अंतरासाठीच्या चाचण्या सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मेट्रो २ अ (दहिसर ते डीएन नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व) वर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने आणखी एक मोठा टप्पा गाठला आहे. शनिवारपासून पहिली प्रोटोटाइप ट्रेन उपलब्ध झाली. त्यामुळे या दोन्ही लाईनवर धनुकरवाडी ते आरे दरम्यान २० किलोमीटर अंतरावर डायनॅमिक चाचणी आणि धावण्याच्या चाचण्या सुरू करण्यात आल्या. ट्रॅक्शन कंट्रोल अँड मॅनेजमेंट सिस्टमच्या एकत्रीकरणाने या चाचण्या सुरू झाल्या आहेत.
डायनॅमिक चाचणीच्या कालावधीत सहा डब्यांची प्रोटोटाइप ट्रेन विविध वेगात धावेल. डायनॅमिक अवस्थेत विविध उपप्रणाली आणि उपकरणांची चाचणी केली जाईल. सिग्नलिंग, प्लॅटफॉर्म स्क्रीन दरवाजे, टेलिकॉम एकत्रीकरणाव्यतिरिक्त कामगिरी सिद्ध करणाऱ्या चाचण्या तपासल्या जातील. ही चाचणी सुमारे दोन महिने सुरू राहील. त्यानंतरच भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेडने तयार केलेली पहिली प्रोटोटाइप ट्रेन सुरक्षा चाचणीसाठी देण्यात येईल. त्याला आणखी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यानंतर ही ट्रेन रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडे तपासणी व प्रमाणपत्र घेण्यासाठी पाठविण्यात येईल.
दरम्यान, फेज-१ मधील या वाहतुकीचे काम ऑक्टोबर २०२१ मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. बीईएमएलने मान्य केल्यानुसार सप्टेंबर २०२१ अखेरपर्यंत एकूण १० रेल्वे संच (प्रत्येक महिन्यात दोन) दिले जातील.
* कामात काेराेनाचा अडसर
कोरोनाच्या कारणास्तव उड्डाण विस्कळीत झाल्यामुळे सिग्नलिंग व दूरसंचार समजून घेण्यासाठी डेन्मार्क, फ्रान्स, दक्षिण कोरिया, फिनलँड, स्पेनमधील तज्ज्ञांची उपलब्धता जवळपास एक वर्ष नव्हती. त्यामुळे भारत, युरोप आणि जपान या तीन वेगवेगळ्या टाईम झोनमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रोप्युलेशन आणि ब्रेक सिस्टमचे सिंक्रोनायझेशन करण्यात आले.
* पुढील वर्षाच्या सुरुवातीला मेट्राे लाईन सज्ज
शक्य तितक्या लवकरच सार्वजनिक सेवेसाठी मेट्रोच्या दोन्ही लाईन सुरू करू याची आम्ही खात्री देतो. टप्प्याटप्प्याने कामे सुरू करण्याचा विचार आहे. दोन्ही लाईनवर २० किलोमीटरपर्यंतची जागा प्रथम सार्वजनिकपणे खुली करण्यात येईल. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला प्रवाशांसाठी मेट्रो लाईन सज्ज असेल.
- एस. व्ही. आर श्रीनिवास, आयुक्त, एमएमआरडीए.