आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्त्वाचा की सत्तेची लाचारी?, राणेंचा प्रहार
By महेश गलांडे | Published: December 31, 2020 06:53 PM2020-12-31T18:53:56+5:302020-12-31T18:54:49+5:30
शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता.
मुंबई - मराठवाड्याची राजधानी अशी ओळख असलेल्या औरंगाबाद शहराचं नामांतर करुन या शहराला संभाजीनगर हे नाव देण्याची शिवसेनेची आग्रही मागणी आहे. मात्र, गेल्या 5 वर्षे शिवसेना सत्तेत असतानाही आणि विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून शिवसेना पक्षप्रमुख हेच राज्याचे मुख्यमंत्री असतानाही औरंगाबादचे संभाजीनगर झाले नाही. पण, या नावबदलासाठी हलचाली सुरू असल्याचे वृत्त माध्यमांत झळकले होते, त्यानंतर नामांतरणाला आमचा विरोध असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ठामपणे सांगितलंय. त्यावरुन आता राजकारण सुरू झाल्याचं दिसून येतंय.
शिवसेना नेत्यांकडून औरंगाबादचा उल्लेख नेहमीच संभाजीनगर असाच केला जातो. विशेष म्हणजे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक बातमी शेअर करताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. तर, उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनीही आपल्या पत्रावर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला होता. त्यामुळे, सरकारकडून औरंगाबादचे नामकरण करुन संभाजीनगर हे नवीन नाव ठेवण्याच्या हालचाली होत असल्याचं चर्चा होती. यासंदर्भात बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानंतर, भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शिवसेनेला डिवचले आहे. ''काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू... बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!'' संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची !!!, असे ट्विट करत नितेश राणेंनी शिवसेनेवर शाब्दीक प्रहार केलाय.
काँग्रेसने सांगून टाकले संभाजीनगर होणार नाही! आता बघू..
— nitesh rane (@NiteshNRane) December 31, 2020
बाळासाहेबांचा शब्द महत्वाचा की सत्तेची लाचारी!
संभाजी राजेंचा स्वाभिमान महत्वाचा की मुख्यमंत्री पदाची खुर्ची!!!
शिवसेनेवर टीका करण्याची संधी राणे बंधुंकडून सोडली जात नाही. त्यातच, महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसने संभाजीनगर नावावरुन आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर नितेश राणेंनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
सामाजिक मतभेदाला स्थान नाही
महाविकास आघाडीत काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, पण नामांतराला आमचा विरोध राहिल, असे थोरात यांनी स्पष्टपणे सांगितलंय. महाविकास आघाडीमध्ये कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे, त्यामुळे जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोध राहिल. पण, अद्याप तसा कुठलाही प्रस्ताव समोर नसल्याचंही थोरात यांनी स्पष्ट केलंय. आम्हाला सत्तासुद्धा दुय्यम ठरते, राज्यघटनेची शपथ घेऊन आम्ही सत्तेत आलोय. त्यामुळे, त्या शपथेची प्रताडना होईल, अशी कुठलीही गोष्ट आम्हाला मान्य होणार नाही. महाविकास आघाडीही त्याचा आधारावर निर्माण झालेली आहे. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, असे म्हणत संभाजीनगर या नामांतरणाला आमचा विरोध राहिल, असे बाळासाहेब ठाकरेंनी ठामपणे सांगितंलय.
मनसेची मागणी
शिवसेना हा पक्ष गेल्यावेळी केंद्रात आणि राज्यातही होता. मात्र असे असतानासुद्धा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करावे यासाठी त्यांनी कुठलाही आवाज उठवला नाही. तर संभाजीनगर करण्याच्या मागणीवरून शिवसनेने फक्त राजकरण केले आहे. त्यामुळे आता लोकांना याबातीत शिवसेनेकडून अपेक्षाही राहिली नसल्याचे मनसेच आमदार राजू पाटील यांनी म्हटले होते. तसेच, आता आम्ही यासाठी पुढाकर घेणार असून राज्य सरकाराला औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही मनसेच्या पाटील यांनी म्हटले होते.