Join us

चला, पक्षी पाहुया : शिपाई बुलबुल, ठिपेकवाला पिंगळा आणि बरचं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 6:36 PM

सोशल मीडियावर महाराष्ट्र निसर्ग उद्यानाची  ‘पक्षी मालिका’

सचिन लुंगसेमुंबई : देशासह राज्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. केवळ निसर्गाचे चक्र सुरु आहे. या निसर्गातल्या प्रत्येक घटकाची माहिती मिळावी नागरिकांना मिळावी, पक्ष्यांची माहिती मिळावी; याकरिता आता धारावी येथील महाराष्ट्र निसर्ग उद्यान पुढे सरसावले आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाने पक्ष्यांची ओळख करून देण्यासाठी सोशल मीडियावर  ‘पक्षी मालिका’ हा उपक्रम सुरु केला असून, या उपक्रमास उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे उद्यानाकडून सांगण्यात आले.सध्या भारतामध्ये  कोरोनोचा मोठया प्रमाणावर प्रसार होतो आहे. त्यामुळे निसर्ग प्रेमींना निसर्गाचा आनंद लुटता येत नाही. अशा परिस्थितीत निसर्ग आणि पक्षी प्रेमींना पक्षांची माहिती घर बसल्या मिळावी यासाठी महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्थेने संस्थेच्या अधिकृत फेसबुक पेजवर उद्यानात आढळून येणा-या पक्ष्यांच्या माहितीची  ‘पक्षी मालिका’  सुरु केली आहे. महाराष्ट्र निसर्ग उद्यानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी युवराज पाटील यांनी याबाबत सांगितले, पक्षी मालिकेमध्ये पक्ष्यांचे छायाचित्र, त्यांचे मराठी, इंग्लिश, शास्त्रीय नाव, त्यांचा आकार आणि त्यांच्या अधिवासाची जागा यांची माहिती दिली जाते. या मालिकेला पक्षी आणि निसर्गप्रेमींकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत  शिपाई बुलबुल, नारंगी डोक्याचा कस्तुर, ठिपेकवाला पिंगळा, टिटवी, दयाळ, पांढ-या ठिपक्यांची नाचण, हळद्या, कवड्या धीवर, भारतीय स्वर्गिय नर्तक या पक्ष्यांची माहिती फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. पक्ष्यांची माहिती देण्याची ही मालिका ३ मे पर्यंत सुरू राहणार आहे. तर दुसरीकडे लॉक डाऊननंतर बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद करण्यात आले. येथे पर्यटकांना प्रवेश दिला जात नाही. परिणामी आत असलेले हरणांचे कळप मुक्त विहार करताना आढळल्याचे निसर्गमित्र सुनीश कुंजू यांनी सांगितले होते. बाणगंगा येथेदेखील रस्त्यांवर मोर निदर्शनास आले होते. येथे मानवाचा संचार कमी झाल्याने पक्षी आणि प्राण्यांचा संचार वाढला. आवाज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनीदेखील वांद्रे येथील पक्षी नोंदी समाजमाध्यमांवर नोंदविल्या होत्या. मुंबईकरांची सकाळ पक्ष्यांच्या किलबिलाटाने होत असल्याने सुमेरा यांनी नमुद केले होते. केवळ सुनीश आणि सुमेरा नव्हे तर मराठी विज्ञान परिषदेनेदेखील् निसर्गाचा अ•यास करण्याचे आवाहन नागरिकांना केले.दरम्यान, कोरोनाला थोपविण्यासाठी देशभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. जो तो आपआपल्या परीने स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न करत आहे. याच लॉक डाऊनच्या काळात सर्व काही बंद असताना निसर्गाचे चक्र सुरू आहे. परिणामी याच निसर्गातले काही क्षण; जे तुम्हाला घरी बसून टिपता येतील, ते टिपा आणि आमच्याकडे पाठवा, असे आवाहन मराठी विज्ञान परिषदेने केले. आता ३-४ आठवड्याच्या या लॉक डाऊनच्या काळात पक्षी, प्राणी, वनस्पती, झाडे यांच्यावर काय परिणाम होतो हे पाहण्यासाठीची ही एकमेव दुर्मिळ संधी आहे. यासाठी घराबाहेर पडू नका. सरकारी आदेश मोडला जाईल आणि आपल्यालाच धोका निर्माण होईल, असे काही करू नका. पण घरात बसून, खिडकीतून डोकावून, घराच्या गच्चीवर जाउन, बाल्कनीतून अनेक प्रकारची निरीक्षणे करता येतील. यातून पर्यावरणाच्या संदर्भात आपल्याला काही शिकायला मिळेल, असे परिषदेने म्हटले आहे. 

 

टॅग्स :कोरोना सकारात्मक बातम्याकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपक्षी अभयारण्य