गोदी कामगारांच्या वेतनकराराच्या थकबाकीबाबत तोडगा काढू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:06 AM2021-06-17T04:06:07+5:302021-06-17T04:06:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गोदी कामगारांच्या वेतनकराराच्या थकबाकीबाबत लवकर तोडगा काढू, असे आश्वासन मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष राजीव ...

Let's settle the arrears of dock workers' wage agreement | गोदी कामगारांच्या वेतनकराराच्या थकबाकीबाबत तोडगा काढू

गोदी कामगारांच्या वेतनकराराच्या थकबाकीबाबत तोडगा काढू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गोदी कामगारांच्या वेतनकराराच्या थकबाकीबाबत लवकर तोडगा काढू, असे आश्वासन मुंबई पोर्ट ट्रस्ट अध्यक्ष राजीव जलोटा यांनी दिले. बुधवारी त्यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत कामगारांच्या मागण्यांबाबत चर्चा केली.

मुंबई बंदरात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनकराराची थकबाकी गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार मागणी करूनही थकीत रक्कम न दिल्याने कामगारांनी १४ जूनपासून निषेध आंदोलन सुरू केले आहे. याची दखल घेत अध्यक्ष राजीव जलोटा यांनी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे अध्यक्ष ॲड. एस. के. शेट्ये, सरचिटणीस तथा पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त सुधाकर अपराज आणि ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सरचिटणीस तथा विश्वस्त केरसी पारेख यांनी कामगारांच्या मागण्यांकडे त्यांचे लक्ष वेधले.

कामगारांच्या मागण्या न्याय्य आहेत. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या आर्थिक स्थितीत घसरण झाल्यामुळे कामगारांची थकबाकी देता आली नाही. मात्र, पैशाची व्यवस्था करून लवकरात लवकर वेतन कराराची थकबाकी देण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करेल. या महिना अखेरपर्यंत नौकानयन मंत्री मनसुख मांडविया हे मुंबई बंदराला भेट देणार आहेत. त्या वेळी त्यांच्यासमवेत याबाबत चर्चा करू, असे आश्वासनही जलोटा यांनी दिले.

अध्यक्षांनी दिलेल्या आश्वासनामुळे कामगारांना वेतनकराराची थकबाकी मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे. तरी कामगारांनी सुरू केलेले निषेध आंदोलन १९ जूनपर्यंत कायम राहील व वेतनाची थकबाकी मिळेपर्यंत ते टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल, अशी माहिती कर्मचारी संघटनांनी दिली.

..............................................

Web Title: Let's settle the arrears of dock workers' wage agreement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.