मुंबई - भाजपा नेत्यांकडून लवकरच सरकार पडणार , या तिन्ही पक्षाच्या सरकारमध्ये मतभेद आहेत, असं वारंवार सांगण्यात येत आहे. आत्ता, नुकतेच बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाला चांगलंच यश मिळालं असून एनडीएची सत्ता स्थापन होणार आहे. त्यामुळे, महाराष्ट्रातही राजकीय घडामोडी घडतील आणि राज्यातील सरकार पडेल, अशी विधानं काही भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहेत. मात्र, सरकारमध्ये योग्य समन्वय असून किमान समान कार्यक्रमानुसार हे सरकार चालत असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटलंय.
भाजपा नेत्यांच्या आणि समर्थकांच्या या टीपण्णीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिलंय. आम्ही मनात आणलं तर भाजपा रिकामं होईल, भाजपमधील अनेक आमदार पक्षात येण्यास उत्सुक असल्याचं मलिक यांनी म्हटलंय. 'माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष व इतर काही नेते गेल्या १ वर्षांपासून अशी विधाने करत आहेत. कारण, सत्येशिवाय त्यांना राहता येत नाही. महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार आहे. आमचे सरकार हे एकजुटीने किमान समान कार्यक्रमावर काम करत आहे. तिन्ही पक्षाची विचारधारा वेगळी आहे, पण कोणीही आपली विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही. जर आम्ही ठरवलं तर भाजप रिकामी होईल पण आम्हाला असे करायचे नाही.'', असे मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एका वाहिनीने घेतलेल्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, काही भाजप आमदारांची आमच्या पक्षात येण्याची इच्छा आहे. त्यामुळे एखादा ट्रेलर लवकरच रिलीज होईल, असे म्हणत भाजपाला धोक्याची घंटा असल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.