आता शाळा सुरू कराच .... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:07 AM2021-09-19T04:07:09+5:302021-09-19T04:07:09+5:30
विद्यार्थी, शिक्षक आणि फळा यांतील संवाद कायम रहायला हवा...! राज्यस्तरीय परिसंवादातील सूर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई विद्यार्थी पालक आणि ...
विद्यार्थी, शिक्षक आणि फळा यांतील संवाद कायम रहायला हवा...! राज्यस्तरीय परिसंवादातील सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई
विद्यार्थी पालक आणि फळा हा संवाद कायम रहायला हवा आणि त्यासाठी दिवाळीची वाट न पाहता शाळा लवकरात लवकर सुरू कराव्यात असे मत शिक्षक, पालक, शिक्षणतज्ज्ञ, स्वयंसेवी संस्थांच्या राज्यस्तरीय परिसंवादात मांडण्यात आले. मागील दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंदमुळे बालमजुरी, बालविवाह यांच्याकडे आपोआप वळलेली मुले, विद्यार्थ्यांचे सामाजिक , शैक्षणिक, मानसिक दृष्टिकोनातून झालेले नुकसान तसेच शाळा सुरू झाल्यानंतर घेण्यात येणारी काळजी, उपाययोजना, शिक्षण विभागाची भूमिका आणि प्रयत्न अशा अनेक मुद्द्यांवर या परिसंवादात अभ्यासकांकडून आपापले मत मांडण्यात आले. याचे आयोजन शिक्षण हक्क मंच, मैत्री संस्था आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांच्याकडून संयुक्तरीत्या करण्यात आले होते.
सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे मात्र खरंच मुले शिकत आहेत का, हा खरा प्रश्न आहे. तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अनेक अडचणी येतात. मुले शिकवण्यापेक्षा जास्त मोबाईलवरील गेम्स आणि इतर ॲप्समध्ये लक्ष देतात, त्यामुळे शिक्षकांच्या शिकवण्या या एकतर्फीच राहतात. या सगळ्या कारणामुळे ऑनलाईन शिक्षण केवळ थोड्या वेळासाठीचा पर्याय आहे मात्र शिक्षणाचा मार्ग नाही हे अधोरेखित झाल्याचे म्हणणे मांडण्यात आले. या शिवाय हिवरेबाजार येथील सरपंच पोपट पवार यांनी आपल्या गावात कशा प्रकारे पालकांच्या संमतीने , पुढाकाराने आणि लोकसहभागातून ऑफलाईन पद्धतीने वर्ग भरविण्यास सुरुवात केली याचे उत्तम उदाहरण मांडले. त्यांच्या गावातील ऑफलाईन शाळांतील शिकवण्यांना आता १०० दिवस पूर्ण होणार असून इतर गावांत, जिल्ह्यांतील सरपंचांना मार्गदर्शन करून प्रत्यक्षात शाळा सुरू करण्यासाठी आपण निश्चित पद्धतीने पुढाकार घेऊ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.
माजी शिक्षण संचालक आणि शिक्षणतज्ज्ञ यांनी परदेशांतील शाळांच्या स्थितीचा आढावा घेत तेथील शिक्षण प्रत्यक्ष शाळांच्या माध्यमातून कसे सुरू आहे याची माहिती परिसंवादादरम्यान दिली. यासाठी त्यांनी कॅलिफोर्निया, अर्जेंटिना, व्हर्जिनिया, तसेच युरोपातील स्वित्झर्लंड, नेदरलँड, जर्मनी, लंडन येथील आपले परिचित पालक, शिक्षणतज्ज्ञ आणि अभ्यासक यांच्याशी संवाद साधून तेथील शाळा कशा पद्धतीने सुरू आहेत, काय उपाययोजना शासनाकडून केल्या जात आहेत याची माहिती दिली. या शिवाय या परिसंवादात शिक्षण अभ्यासक किशोर दरक, नॅशनल सेंटर फॉर एज्यकेशन अँड इमर्जन्सीचे गुरुमूर्ती काशीनाथन, सेव्ह द चिल्ड्रेन संस्थेचे उपसंचालक संजय शर्मा, मैत्री संस्थेच्या विनीता ताटके आणि शिक्षण हक्क मंचाच्या हेमांगी जोशी यांनी आपले मते मांडत सहभाग दर्शविला आणि शाळा सुरू करा, असा ठराव या परिसंवादातून मांडला.
कोट
शाळा बंद ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग होणार नाही याला काडीचा अर्थ नाही, असे म्हणत शाळा सुरू करण्याच्या मताला दुजोरा दिला. शाळा सुरू केल्याने संसर्गाचा धोका वाढेल याला शास्त्रीय आधार नसून जरी संसर्ग झाला तरी मुलांमधील प्रतिकारशक्ती ही चांगली असल्याने तो बरा होणारा असणार आहे. राज्यकर्त्यांना शाळा सुरू करण्याची रिस्क घ्यायची नाही मात्र त्याची किंमत शैक्षणिक, मानसिक स्वरूपात पालक विद्यार्थ्यांना मोजावी लागत आहे
अनंत फडके, जनआरोग्य अभियान महाराष्ट्र