Join us

चला शपथ घेऊ या, अवयवदाता बनू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2019 3:29 AM

अवयवदानाच्या जनजागृतीसाठी एअर इंडिया बिल्डिंग ते जे. जे. जिमखाना ‘महारॅली’

मुंबई : ‘चला आजच शपथ घेऊ या, अवयवदाता बनू या!’ अशी शपथ घेत जे.जे. रुग्णालयाने २७ आॅगस्टपासून सुरू केलेल्या ‘महाअवयवदान अभियान - २०१९’ची सांगता महारॅलीने करण्यात आली. जे.जे. रुग्णालयाने अवयवदानाचे महत्त्व जनमानसात पोहोचविण्यासाठी मरिन ड्राइव्हवर एअर इंडिया बिल्डिंगपासून ते जे.जे. जिमखानापर्यंत रॅलीचे आयोजन केले होते.

या रॅलीत जे.जे. रुग्णालयातील सर्व आरोग्य शाखेचे विद्यार्थी, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या रॅलीत मुंबई विद्यापीठाअंतर्गत असलेल्या अनेक महाविद्यालयांच्या व शाळेच्या विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग नोंदविला. ३० महाविद्यालयांचे व शाळेचे विद्यार्थी मिळून जवळपास तीन हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा जनसागर अवयवदानाच्या चळवळीसाठी एकत्र आला होता.आजही समाजात नेत्र, किडनी, हृदय, यकृत, फुप्फुसे अशा व इतर अनेक अवयवांच्या प्रतीक्षेत लाखो रुग्ण खितपत पडले आहेत. वेळेवर हवा असलेला अवयव मिळाल्यास कित्येक लोकांना पुनर्जन्म मिळू शकतो. कित्येक दुर्धर आजार बरे केले जाऊ शकतात. हाच संदेश तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी सांगितले.पोलीस व अग्निशमन दलाच्या चोख बंदोबस्तात ह्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या रॅलीत अनेक पोस्टर्स तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अवयवदानाचा संदेश लोकांसमोर मांडला.रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या ‘देहदान श्रेष्ठदान’ या घोषणेने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. त्यामुळे मरिन ड्राइव्हवर फिरायला आलेल्या लोकांनीही या रॅलीत सहभाग घेतला.रॅलीनंतर जे.जे. जिमखान्यात ज्या ज्या लोकांच्या सहकार्यामुळे व सहभागामुळे ही रॅली यशस्वी पार पडली अशा लोकांचा व संस्थांचा प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व नंतर अवयवदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. रॅलीनंतर अनेकांनी अवयवदानासाठी आपले नाव नोंदवले.या रॅलीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इस्रायल दूतावासाचे प्रतिनिधी याकोव्ह फ्राइन्स्टाईन उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, अतिरिक्त पोलीस आयुक्त विजयकुमार, डीसीपी निशानदार हेदेखील उपस्थित होते. 

टॅग्स :मुंबई