प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाची उच्च न्यायालयाला माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने पासपोर्ट नूतनीकरणासाठी केलेल्या अर्जावर जलदगतीने निर्णय घेऊ, असे आश्वासन प्रादेशिक पासपोर्ट प्राधिकरणाने उच्च न्यायालयाला सोमवारी दिले.
वांद्रे पोलीस ठाण्यात नोंदविलेला देशद्रोहाचा गुन्हा व कॉपीराईट उल्लंघनप्रकरणी नोंदविलेल्या गुन्ह्याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही फौजदारी प्रकरणे कंगनाविरोधात प्रलंबित नाहीत, असे कंगनाच्या वतीने तिचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी उच्च न्यायालयाला सांगितल्यावर, पासपोर्ट प्राधिकरणाने वरील आश्वासन न्यायालयाला दिले.
देशद्रोहाचा गुन्हा नोंदविण्यात आल्याने पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. कंगनाला ‘धाकड’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बुडापेस्टला जायचे आहे. पासपोर्टची मुदत २१ सप्टेंबर रोजी संपत असल्याने, तिला पासपोर्टचे नूतनीकरण करायचे आहे. मात्र, पासपोर्ट प्राधिकरणाने नकार दिल्याने तिने उच्च न्यायालयात धाव घेतली.
पासपोर्ट प्राधिकरणच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाला सांगितले की, कंगनाने केलेल्या अर्जात चुकीची माहिती भरली होती. त्यामध्ये फौजदारी खटले प्रलंबित असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. त्यावर कंगनाच्या वकिलांनी तिच्यावर या दोन एफआयआरद्वारे कोणताही खटला भरवण्यात आलेला नाही, असे स्पष्ट केले. त्यानंतर सिंग यांनी पासपोर्ट प्राधिकरण कंगनाच्या सुधारित अर्जावर जलदगतीने निर्णय घेईल, असे आश्वासन न्यायालयाला दिले. त्यानुसार, न्यायालयाने कंगनाला सुधारित अर्ज पासपोर्ट प्राधिकरणापुढे सादर करण्याचे निर्देश देत कंगनाची याचिका निकाली काढली.
.......................................................